शिवसेना कायम दुष्काळग्रस्तांसोबत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। बीड

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना नेहमीच धावून आलेली आहे. दुष्काळग्रस्तांना आधार देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. दुष्काळ हटवण्यासाठी ग्रामस्थ एकत्र येत असतील आणि गावाला पाणीदार करण्यासाठी मोहिम राबवत असतील तर अशा गावांमध्ये जेथे जेथे श्रमदान होईल तेथे तेथे या श्रमदानात शिवसैनिक सहभागी होईल. अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुंडलिक खांडे यांनी दिली आणि हातात टिकाव घेवून कामाला सुरूवात केली.

बीड तालुक्यातील पोखरी (मैंदा) येथे नाबार्डच्या अर्थसहाय्याने निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पोखरी ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या श्रमदानात गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांसोबत शिवसैनिक व युवासैनिक सहभागी होत आहेत. काल युवासैनिकांच्या सहभागानंतर आज शिवसेना जिल्हाप्रमुख व शिवसैनिकांनी या श्रमदानात सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी श्रमदात्यांसोबत संवाद साधत येत्या काळात तालुक्यात ग्रामस्थांच्या लोकसहभागातून दुष्काळ निवारण्यासाठी आयोजित श्रमदानात शिवसैनिकही सर्वोतोपरी मदत व सहकार्य करणार असल्याचे सांगत दुष्काळ हटाव मोहिमेत शिवसेनेच्या भूमिकेबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी व शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: टिकाव व फावडे हातात घेत श्रमदानात सहभाग नोंदवला. या श्रमदान मोहिमेत येथील शिवसेना उपसरपंच अशोक असवले यांनी दोन दिवसांचे अन्नदान दिले आहे तर नाथ फाऊंडेशनने सर्व श्रमदात्यांना पाणीपुरवठा निशु:ल्क दिलेला आहे. यावेळी येथील श्रमदात्यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.