
आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत शिवसैनिक म्हणून आपल्याला नव्या ताकदीने उभे राहायचे आहे. तेव्हा एकदिलाने काम करा, खचून जाऊ नका. जोमाने कामाला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसैनिकांना दिले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवन तसेच मातोश्री निवासस्थानी बैठका घेत असून शिवसैनिकांना नव्या जोमाने कामाला लागण्यासाठी उभारी देत आहेत. आजही मातोश्री निवासस्थानी दक्षिण मुंबईतील काही विभागांची बैठक झाली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना म्हणाले, शिवसेनेवर असे बंडखोरीचे प्रसंग याआधीही आले आहेत. शिवसेना अशा प्रसंगांनी कधीही खचली नाही. ज्याप्रमाणे 1966 साली आपण शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरुवात केली. तशी भरारी आपल्याला घ्यायची आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका येत आहेत. या निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड यापुढेही सुरू ठेवायची जबाबदारी आपली आहे.
साहेब आम्ही तुमच्या सोबत
यावेळी शिवसैनिकांनीही आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही खचणार नाही, लढणार. शिवसैनिक लेचापेचा नाही तो कायम तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा घुमल्या. यावेळी शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्यासह विभाग क्र. 11 मधील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






























































