नंदीबैलाला विचारले तर तोही सांगेल भाजप सरकार येणार नाही, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्वीच्या काळी भल्या पहाटे वासुदेव गावात आल्यानंतर दिवसाची सुरुवात पावित्र्याने व्हायची. इच्छापूर्तीसाठी नंदीबैलाकडे मागणे घातले जायचे. आता जर नंदीबैलाला कोणी विचारले की, भाजपचे सरकार येणार का? तर तोही सांगेल नाही, असा जबरदस्त टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. खोक्याने सरकार आणू शकता, पण संस्कार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि परंपरांचे जतन करणाऱ्या जोशी, कुडमुडे, गोंधळी, वासुदेव, चित्रकथी, मेढंगी, बागडी, सरोदे, महाराष्ट्रातीलएनटी-ब प्रवर्गातील बांधव, आराध्य देवतांचे सेवेकरी, भिक्षेकरी, भटके आदी शेकडो लोकांनी आज पारंपरिक वेषामध्ये ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नंदीबैलही सोबत आणले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतानाच, आमच्यावर होणारा अन्याय दूर करा असे गाऱहाणेही त्यांनी यावेळी मांडले. आमची मुलेबाळे सुशिक्षित असूनही अद्याप नोकऱ्यांसाठी भटकत आहेत, आम्हाला आरक्षण नाही, सरकारने आमच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे, अशा व्यथाही त्यांनी मांडल्या.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी या सर्वांचे स्वागत करतानाच त्यांना मार्गदर्शनही केले. बऱ्याच दिवसांनंतर आपल्याला वासुदेव, गोंधळी, नंदीबैल दिसला असे सांगत त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. पूर्वी वासुदेव आल्यानंतर दिवसाची सुरुवात पावित्र्याने व्हायची. सकाळ झाली असे वाटायचे, पण शहरातून या परंपरा हद्दपार झाल्या आहेत. आता फक्त खुर्ची कशी टिकेल यासाठी मंत्र्यांचा आटापिटा सुरू आहे. अनेक मंत्री नाराज आहेत, पण तुमच्या समाजावर होणारा अन्याय पाहून एक तरी मंत्री नाराज झालाय का, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी मिंधे सरकारवर केली.

यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, गोंधळी समाजाचे नेते दिलीप शिंदे उपस्थित होते. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे गरीब कुटुंबातील माझ्यासारखी व्यक्ती चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आली. उद्धव साहेबांनी आशीर्वाद द्यावा व आमच्या पाठीशी उभे राहावे यासाठी आम्ही आज ‘मातोश्री’वर आलो, असे गोंधळी समाजाचे नेते दिलीप शिंदे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जपणाऱ्यांचा मेळावा घेणार

उद्धव ठाकरे यांनी यावेळी वासुदेव, गोंधळी व अन्य समाजातील लोकांना एकत्र व्हा असे आवाहन केले. पूर्ण राज्यभर तुम्ही एक व्हा. नंतर या सर्व परंपरा, संस्कृती जपणाऱ्यांचा आपण मेळावा घेऊ. त्या मेळाव्यात तुम्ही तुमच्या व्यथा मोकळेपणाने मांडा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही ‘मातोश्री’वर आलात हाच मोठा आशीर्वाद आहे. सत्ता आली गेली काही हरकत नाही, पण आपल्यावरचे संस्कार मी पुसू देणार नाही. शिवसेना तुमच्या सोबत आहे. तुमच्यावरील अन्याय दूर करू, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला.

हे तर बोगस रामभक्त

गंगाजलावर जीएसटी कसा लावता? भाजपच्या राज्यात श्रद्धाळूंनी पूजा-पाठही करायचा नाही का? तुम्ही बोगस रामभक्त आहात. सनातन संस्कृतीचा महिमा गाणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी तोफ छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी डागली.