
सामना प्रतिनिधी । मालवण
मुसळधार पाऊस व जोरदार समुद्री लाटांच्या तडाख्यात देवबाग बंधार्याला शुक्रवारी भगदाड पडले. अनेक घरांना धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत होते. दरम्यान, बंधार्याच्या तात्काळ दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांनी दगड उपलब्ध केले असून बंधार्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.
किनार्यावर जोरदार समुद्री लाटा धडकत असल्याने
जीर्ण झालेला बंधारा अनेक ठिकाणी ढासळत असून सुटलेले दगड समुद्रात वाहून जात आहेत. शुक्रवारी अजस्त्र लाटांच्या तडाख्यात ख्रिश्चनवाडी येथे भगदाड पडले. समद्राचे पाणी थेट वस्तीत घुसून घरांवर धडकत असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत होते. ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख जिप सदस्य हरी खोबरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार वैभव नाईक यांनी कोसळलेल्या बंधार्याच्या दुरुस्तीसाठी स्वखर्चातून तत्काळ काही डंपर मोठे काळे दगड उपलब्ध करून दिले. कोसळलेल्या बंधार्याची दुरुस्ती सुरू झाली असून आवश्यकतेनुसार अजूनही दगड उपलब्ध केले जातील, असे आमदार नाईक यांनी ग्रामस्थांना आश्वासीत केले आहे
जिओ ट्यूब उभारणी होणार
गतवर्षी अनेक ठिकाणी नादुरुस्त बनलेल्या देवबाग बंधार्याची दुरुस्ती आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून पतन विभागाच्या माध्यमातून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. तर आणखीन ४ ठिकाणी दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच अति धोकादायक ठिकाणी लाटांची तीव्रता कमी करण्यासाठी उभारण्यात येणार्या जिओ ट्यूब साठी अडीज कोटी निधी मंजूर आहे. यातून ख्रिश्चनवाडी किनार्यावर जिओ ट्यूब उभारणी होणार आहे.


























































