आगामी निवडणुकांत हितचिंतकांची ताकद जोडल्यास विजय निश्चित-खासदार जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शिवसेना हा केवळ राजकीय पक्षच नसून एक धगधगता विचार आहे. शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार व कार्यकर्ता ताकतीवर शिवसेनेला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही. शिवसेना प्रमुखांचा विचार महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेला आहे. या विचाराला शिवसैनिकांसोबत हितचिंतकांची ताकद जोडल्यास आगामी निवडणुकांमध्ये विजयी घोडदौड निश्चित आहे, असा विश्वास खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या वतीने येथील अक्षदा मंगल कार्यालयात शनिवार, ३ नोव्हेंबर रोजी परभणी विधानसभा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन खासदार संजय जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मार्गदर्शक राम भोजने, जिल्हाप्रमुख विशाल कदम, विधानसभाप्रमुख माणिक पोंढे, युवा अधिकारीअर्जून सामाले, अतुल सरोदे, महिला जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, संजय सारणीकर, सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदु आवचार, सोपानराव आवचार, सविता मठपती, कुसूम पिल्लेवाड यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना खासदार जाधव म्हणाले, सामान्य कार्यकर्त्यांना व्यासपीठ देणारा पक्ष शिवसेना आहे. शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत विचारावर इथला मतदार व कार्यकर्ता प्रभावीत झालेला आहे. १९९० पासून ते आज तागायत ही विधानसभा तर १९८९ पासून लोकसभा शिवसेनेच्या ताब्यात आहे. ती कायम अशीच राहणार आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे आप-आपली जबाबदारी स्विकारून ते पूर्ण केल्यास यश आपलेच आहे, असेही मत यावेळी व्यक्त केले.

मुख्य मार्गदर्शक राम भोजने म्हणाले, सर्व सामान्य कार्यकर्ता हा पक्षाची ताकद आहे. कार्यकत्र्याच्या बळावरच पक्ष उभा आहे. एका कार्यकर्त्यांने २५ हितचिंतक सोबत घ्यावे. शिवसेनेचा गोतावळा मोठा आहे. त्याला हितचिंतकाची जोड मिळाल्यास यशाचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. आगामी काळात पक्ष बुथसमित्याची आखणी करणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन भोजने यांनी यावेळी केले. यावेळी परभणी विधान सभेतील पदाधिकारी व कार्यकर्तेमोठ्या संखेने उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने असे शिबीरे जिल्ह्यातील चार ही विधानसभा मतदार संघात आयोजित केले आहेत. शनिवारी परभणी व जिंतूर विधानसभेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

परभणी : येथील अक्षदा मंगल कार्यालयात परभणी विधानसभा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराप्रंसगी मार्गदर्शन करताना खासदार संजय जाधव. व्यासपीठावर मार्गदर्शक राम भोजने, जिल्हाप्रमुख विशाल कदम, विधानसभाप्रमुख माणिक पोंढे, युवा अधिकारीअर्जून सामाले, अतुल सरोदे, महिला जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, संजय सारणीकर, सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदु आवचार, सोपानराव आवचार, सविता मठपती, कुसूम पिल्लेवाड आदी.