
सामना प्रतिनिधी, पालघर
तालुक्यातील आगवण पाडा येथील दोन घरांना आग लागून एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. शिवाजी माच्छी आणि मच्छिंद्र माच्छी यांचे कुटुंबच उघडय़ावर पडले. मात्र या दोन्ही कुटुंबांच्या मदतीला शिवसेना धावून आली. तातडीची मदत म्हणून दोन्ही कुटुंबाना प्रत्येकी 25 हजारांची मदत आज करण्यात आली.
पंचाळे गावातील आगवण पाडा येथे मितना समाजाची वस्ती आहे. दोन दिवसांपूर्वी शिवाजी माच्छी आणि मच्छिंद्र माच्छी यांच्या घरांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकणारी ही गरीब कुटुंबे अक्षरशः उद्ध्वस्त झाली. मात्र शिवसेनेने सामाजिक भान जपत त्यांना मोठा आधार दिला.
पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे यांनी दोन्ही कुटुंबांना 25 हजारांची तत्काळ मदत केली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेश शहा, लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, तालुकाप्रमुख विकास मोरे, पालघर पंचायत समितीचे उपसभापती मेघन पाटील, उपतालुकाप्रमुख अनिल तरे, सरपंच मिनेश पाटील, उपसरपंच जयश्री माच्छी, शैलेश पाटील आदी उपस्थित होते.




























































