आम्हाला काही नको, फक्त तुम्ही आणि शिवसेना हवी! पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांची एकच मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पुन्हा ताकदीनिशी उभी राहील असा विश्वास शिवसैनिकांना दिला आहे. शिवसेनेच्या विभागवार बैठका सुरू असून आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे देता येणे शक्य होते ते मी ज्यांना द्यायचे त्यांना दिले, पण त्यांनी त्यांचे गुण दाखवलेत. आता माझ्याकडे देण्यासारखे काही नाही, असे विधान शिवसैनिकांना उद्देशून केले. यावेळी शिवसैनिकांनीही साहेब, आम्हाला काही नको असे निक्षून सांगतानाच आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही फक्त लढ म्हणा, अशी ग्वाहीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱयाच दिवसापासून शिवसेना भवन, ‘मातोश्री’ येथे शिवसैनिकांच्या विभागवार बैठका घेत आहेत. प्रत्येक बैठकीत साहेब, आम्ही तुमच्यासोबतच आहोत, असा विश्वास शिवसैनिकांकडून दिला जात असून बंडखोर आमदारांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पुणे, मुंबई, कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांच्या पार पडलेल्या बैठकीतही शिवसैनिकांनी हीच ग्वाही दिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला शिवसेना फोडायची नाही तर शिवसेना संपवायची आहे म्हणून हे भ्रमाचे वातावरण केले जात आहे. सांगताहेत आम्ही तर तुमचाच माणूस मुख्यमंत्री केला आहे, आणखी काय? हे शिवसेना संपवायला निघालेत, त्यांना शिवसेनेचे अस्तित्व नको आहे, असे सांगत भाजपचे षड्यंत्र शिवसैनिकांसमोर उघड केले.

शिवसेना एकच आहे आणि एकच राहील ती म्हणजे आपली शिवसेना!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, तुम्ही जो हातात भगवा धरलाय तो ठामपणे धरायचा आहे. शिवसेना एकच आहे, एकच होती आणि एकच राहील ती म्हणजे आपली शिवसेना आहे, असे सांगताच ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा घुमल्या. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे यावेळी धन्यवाद मानले. मला तुमच्याकडे देण्यासारखे काही नाही हे वाक्य त्यांनी उच्चारताच शिवसैनिक गहिवरले. साहेब, आम्हाला काही नको, काही नको, असा प्रतिसाद त्यांनी दिला. शिवसेना आपल्याला पुन्हा ताकदीनिशी उभी करायचीय, अशी साद यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घालताच ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांबरोबरच ‘शिवसेना आमच्या ठाकरेंची, नाही कुणाची बापाची’ अशी गगनभेदी घोषणा शिवसैनिकांनी दिली.