
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा तसेच शिवसेना हे नाव न वापरण्याचा हंगामी निर्णय घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आज शिवसेनेला नवे नाव आणि नवीन चिन्ह दिले. शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे धनुष्यबाण चिन्ह मिळण्याआधी शिवसेनेकडे मशाल हे चिन्ह होते. याच चिन्हावर शिवसेनेने इतिहास घडवला होता.
छगन भुजबळ हे नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना शिवसेनेचे मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि छगन भुजबळ याच चिन्हावर निवडून आले. त्यानंतर एप्रिलमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली त्यात देखील ते नगरसेवक पदासाठी उभे होते.

1985 साली शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यावेळी चिन्ह होते धगधगती मशाल. या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली आणि मशालीने इतिहास घडविला.
हाती घेऊ “मशाल” रे!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
निशाणी : मशाल pic.twitter.com/ryPOTMikxX— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 10, 2022
दरम्यान, संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे पहिले खासदार मोरेश्वर सावे 1989 मध्ये याच मशाल चिन्हावर निवडून आले होते.
‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाची ‘मशाल’ धगधगणार! आयोगाचे नाव-चिन्हावर शिक्कामोर्तब




























































