
बॉलिवूडची आघाडीची पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिच्या गाण्याचे असंख्य चाहते आहेत. तिच्या सुमधूर आवाजाने तिने आतापर्यंत अनेक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. पण, श्रेयाचा तोच सुमधूर आवाज पूर्णपणे गेल्याची माहिती मिळत आहे.
अमेरिकेतील एका कॉन्सर्टनंतर श्रेयाचा आवाज संपूर्णतः गेल्याची माहिती श्रेयानेच तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून दिली आहे. या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अमेरिकेतील ऑरलँडा येथे श्रेया म्युझिक कॉन्सर्टसाठी गेली होती. रात्री कॉन्सर्ट झाल्यानंतर तिच्या गळ्यातून आवाज येणं बंद झालं.
तिने ताबडतोब वैद्यकीय मदत घेतली. डॉक्टरांनी तिच्यावर इलाज केले. सुदैवाने तिचा आवाज पुन्हा पूर्ववत झाला. त्यानंतर तिने न्यूयॉर्क अरिना येथे तीन तास पुन्हा गायन केलं. या संपूर्ण अनुभवाविषयी श्रेयाने माहिती शेअर केली आहे.
या संपूर्ण अनुभवानंतर आपण भावुक झाल्याचं म्हणत श्रेयाने आपला बँड, फॅम आणि ए टीम यांचे आभार मानत त्यांच्यावर खूप प्रेम करत असल्याचं म्हटलं आहे. आपल्या वाईट काळात त्यांनी आपली साथ दिल्याचंही तिने लिहिलं आहे.

























































