श्रीगोंद्यातील आयडीबीआय बँकेला 26 लाखांचा गंडा, बनावट कागदपत्रांनी फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रूक येथील सातजणांनी संगनमत करून बनावट शेतीचे सातबारा उतारे, फेरफार तसेच खोटे दस्त तयार करून श्रीगोंदा शहरातील आयडीबीआय बँकेकडून 25 लाख 61 हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी बँक मॅनेजर अजय पोपट दानवे यांनी फिर्याद दिली असून, अंकुश जालिंदर वैद्य आणि महेश सोपान राऊत (रा. पिसोरे बु.) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

श्रीगोंदा शहरातील आयडीबीआय बँकेकडून तालुक्यातील पिसोरे बुद्रूक येथील अंकुश जालिंदर वैद्य- 4 लाख 60 हजार रुपये, जालिंदर खंडू वैद्य- 2 लाख रुपये, वैभव दादा थोरात- 3 लाख रुपये, सोपान दादा राऊत- 3 लाख रुपये, चंद्रकला शिवाजी राऊत- 4 लाख 95 हजार रुपये, महेश सोपान राऊत- 3 लाख 11 हजार रुपये, मीना सोपान राऊत- 4 लाख 95 हजार रुपये असे एकूण 25 लाख 61 हजार रुपये पीककर्ज सन 2017 ते 2018 या कालावधीमध्ये वरील 7 जणांनी घेतले होते.

या पीक कर्जाचा एकही हप्ता न भरल्याने कर्ज थकीतमध्ये गेले. बँकेचे शाखाधिकारी अजय दानवे यांनी डिसेंबर 2021 मध्ये थकीत कर्जाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता कागदपत्रात शेतीचे खोटे सातबारा उतारे, फेरफार तसेच खोटे दस्त दिल्याचे उघडकीस आले. दानवे यांनी बँकेचे अधिकृत वकील सुभाष संभाजी बोरुडे यांच्यामार्फत पीककर्ज तसेच त्यावरील व्याज भरण्यासाठी 21 मार्च 2022 रोजी अधिकृत नोटीस पाठविली.

या नोटीसला कोणतेही उत्तर न मिळाल्याने शाखाधिकारी दानवे हे आपल्या सहकाऱयांसह पीक कर्जाच्या वसुलीसाठी संबंधितांकडे गेले असता त्यांनी कर्ज भरण्यास नकार दिल्याने दोन महिलांसह 7 जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यातील अंकुश जालिंदर वैद्य आणि महेश सोपान राऊत या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, इतर 5 जण फरार झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करीत आहेत.

श्रीगोंदा शहरातील राष्ट्रीयकृत बँकेला बनावट कागदपत्रे देऊन सुमारे 26 लाख रुपयांचे पीककर्ज घेऊन बँकेला गंडा घातल्याचे गुन्हा दाखल झाल्यानंतर उघडकीस आले. मात्र, कर्ज देताना बँकेच्या तत्कालीन अधिकाऱयांनी कागदपत्र तयार करणारे बँकेचे वकील तसेच गहाणखत तयार करताना दुय्यम निबंधक तसेच तलाठी यांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करता कर्ज वितरण कसे केले, अशी चर्चा होत आहे.