
मला एकच एक पुस्तक आवडलं आहे असं कधी झालं नाही. कारण आईबाबा चांगले वाचक असल्याने माझंही मराठी, इंग्रजी साहित्य, कथा, कादंबरी, ललित अशा सर्वच प्रकारचं वाचन झालं आहे. आताही होत असतं. यात मला मनापासून आवडलेलं पुस्तक म्हणजे गीत सेठी यांचं सक्सेस व्हर्सेस जॉय. गीत सेठी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले बिलियर्ड्स प्लेअर. बिलियर्ड्स या खेळात एक काळ गाजवणाऱया गीत सेठी यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवल्या आहेत.
एक-एक, दीड-दीड पानाच्या छोटय़ा लेखांमधून त्यांनी काही प्रसंग मांडले आहेत. त्या प्रसंगात ते कसे वागले, कोणते अडथळे त्यांना पार करावे लागले, कठीण प्रसंगांवर त्यांनी कशी मात केली याचं वर्णन करणारे हे लेख वाचकाला अंतर्मुख करतात. पुस्तकाचं नावच यश विरुद्ध आनंद असा आंतरिक संघर्ष दर्शविणारं आहे. आपल्याला भरपूर काम करायचं असतं, त्यातून भरपूर पैसा कमवायचा असतो आणि त्यातून आनंद प्राप्त करायचा असतो. हे सगळं मिळतं ते यश प्राप्त केल्यानंतर. आपल्याला हव्या असलेल्या आनंदासाठी आपण यशाच्या मागे किती फिरणार आहोत. कारण एकदा तुम्ही आनंद मानायला लागलात की, तुम्हाला दुŠखच वाटत नाही. तुम्ही यशस्वी आहात म्हणून तुम्ही आनंदी आहातच असे नाही, परंतु तुम्ही आनंदी असता तेव्हा यश तुम्हाला मिळाल्यासारखं असतं. हे जगण्याचं समीकरण एका टप्प्यावर तुम्हाला जाणलं पाहिजे. एका यशस्वी खेळाडूचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहताना प्रत्येकालाच या संघर्षाला सामोरं जावं लागतं हे जाणवलं. अतिशय सोप्या आणि सहज भाषेत जगण्याचं तत्त्वज्ञान यातील प्रत्येक लेखातून, प्रसंगातून आपल्याला मिळतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर पुढे जाण्यासाठी कधीतरी काही पुस्तकं आपल्याला मदत करतात, त्यापैकीच हे एक पुस्तक आहे असं मी म्हणेन.
दुसरं आवडलेलं एक पुस्तक म्हणजे दीपक करंजीकर यांचं घातसूत्र. जागतिक पटलावर घडणाऱया घटनांचे पडसाद कसे असतात आणि त्यापासून किती अनभिज्ञ असतो हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. जागतिकदृष्टय़ा अशा घटनांचा चेहरा वेगळा असतो आणि त्या घटना जागतिक अर्थकारणावर कशा परिणाम करतात याची उकल करून देणारं हे पुस्तक आहे. जागतिक घटनांचा वेध घेताना अतिशय तार्किक पद्धतीने त्यातले बारकावे मांडले आहेत. आपली आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती बदलण्यामागचं अदृश्य वास्तव म्हणजे नेमकं काय हे पुस्तक वाचताना कळतं. याबरोबरच दृश्यात्मक परिणाम साधणारं असं हे पुस्तक आहे. असा परिणाम साधणाऱया लेखकांपैकी एक असणाऱया हृषीकेश गुप्ते यांची दंशकाल, घनगर्द, हाकामारी, काळजुगारी अश सर्वच पुस्तकं वाचायला आवडतात. याशिवाय मला आत्मचरित्रं वाचायला फार आवडतात. त्यातून आपल्याला लोकांचं जगणं कळतं. नरेंद्र जाधव यांचं ‘आमचा बाप अन् आम्ही’ हे मला आवडणाऱया काही आत्मचरित्रपर पुस्तकांपैकी एक. या पुस्तकांतून आपल्यापलीकडे लोक कसं आयुष्य जगतात, त्यांचा संघर्ष हे वाचणं स्वतŠला वेगळा अनुभव देणारं असतं.
शब्दांकन: शुभांगी बागडे


























































