बंद देवळांमध्ये पुन्हा घंटानाद, महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे अंतर्गत मतभेद, मानपानाचे वाद आणि समन्वयाच्या अभावामुळे कुलूपबंद झालेल्या देवळांमध्ये आता पुन्हा चैतन्य निर्माण होऊ लागले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे बंद पडलेल्या मंदिरांत पुन्हा घंटानाद घुमू लागल्याची माहिती महासंघाचे संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे शरद राऊळ, यशवंत परब, हिंदू जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील तसेच विविध गावांतील मानकरी उपस्थित होते. महासंघाने राबविलेल्या नाम सत्संग, माणगाव येथील जिल्हा मंदिर परिषद आणि गावागावांतील प्रत्यक्ष संवाद या त्रिसूत्रीमुळे विखुरलेले मानकरी पुन्हा एकत्र येत असून अनेक देवस्थानांनी सुव्यवस्थापन आणि धर्मरक्षणाची कास धरली आहे, असे जोशी यांनी सांगितले.

अनेक वर्षे बंद असलेली मंदिरे पुन्हा सुरू

महासंघाच्या प्रयत्नांतून सावंतवाडी तालुक्यातील घारपी-उडेली येथील ग्रामदैवत मंदिर, माडखोल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिर, कुडाळ तालुक्यातील पडवे येथील देव रवळनाथ मंदिर, कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील लिंग माऊली मंदिर, दोडामार्ग तालुक्यातील उगाडे येथील ग्रामदैवत मंदिर तसेच मालवण तालुक्यातील नांदरुख येथील श्री देव गिरोबा मंदिर अशी अनेक वर्षे बंद असलेली मंदिरे पुन्हा सुरू करण्यात यश आले आहे. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आणि परंपरा पुन्हा सुरू झाल्याने गावांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.