‘सिंहगड’ च्या वेळेची ना खात्री, चाकरमान्यांच्या पगाराला कात्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे – मुंबईदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. पुण्यातून वेळेवर निघणारी सिंहगड एक्स्प्रेस गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उशिराने पोहोचत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. परिणामी अनेकांना लेट मार्क लागत आहे. त्यामुळे 20-25 मिनिटांमुळे हाफ डे लागत आहे. त्यामुळे सिंहगड एक्स्प्रेस वेळेत धावली पाहिजे, अशी मागणी नोकरदार प्रवाशांकडून होत आहे.

सिंहगड एक्स्प्रेसमधून दररोज पुणे – मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सिंहगड एक्स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 6.05 वाजता सुटते. पुढे ती खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, दादर येथे थांबे घेत सकाळी 9.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचण्याची वेळ आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कर्जतला गेल्यावर सिग्नल मिळत नाही. त्यामुळे या गाडीला 20 ते 30 मिनिटे उशीर होत आहे. त्यामुळे कामावर लेट मार्क लागत आहे. परिणामी हाफ डे लागतो. सिंहगड एक्स्प्रेस सकाळी दहापर्यंत मुंबईत पोहोचत असल्यामुळे दररोज प्रवास करणारे चाकरमानी या ट्रेनने प्रवास करतात. पण, गेल्या काही दिवसांपासून या गाडीचा वेग मंदावल्याने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा फटका बसत आहे. सतत होणाऱ्या उशिरामुळे वेतन कापणे, कामावर हजर करून न घेणे, अशा समस्यांचा सामना नोकरदार वर्गाला करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सिंहगड एक्स्प्रेसचे परिचालन वेळेत करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

सिंहगड एक्स्प्रेस पुण्यातून वेळेत निघते. परंतु, कर्जतच्या पुढे गेल्यावर या गाडीला सिग्नल मिळत नाही. काही वेळा लोकल सोडल्या जातात. त्यामुळे गाडीला 20 ते 30 मिनिटे उशीर होतो. त्यामुळे नोकरदारांचा विचार करून या गाडीला वेळेवर धावण्यासाठी मदत करावी.
-नागेश मस्के, प्रवासी