बेस्टच्या नामफलकांवर ‘सायन’चे होणार ‘शीव’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई 

बेस्ट उपक्रमात सुरू असलेल्या अनेक गाडय़ांच्या नामफलकांवर आता ‘सायन’ऐवजी ‘शीव’ असे लिहिले जाणार आहे. बेस्टने नामफलक बदलाची ही कार्यवाही सुरू केली असून टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करण्याबाबतच्या सूचना 7 मे 2018च्या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. या ‘परिपत्रका’चा आधार घेत दक्ष रहिवासी नंदकिशोर साळवी यांनी ‘सायन’ या इंग्रजी भाषेतील शब्दाऐवजी मूळ मराठी असलेला ‘शीव’ हा शब्द वापरण्यासाठी मराठी भाषा विभाग, बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिकेकडे पाठपुरावा केला. त्यात त्यांना यश आले. सायन लिहिलेल्या सर्व नामफलकांचे नामकरण शीव केले जाणार असून त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्य्याने केली जाईल, असे पत्र बेस्ट उपक्रमाने साळवी यांना दिले आहे. त्यामुळे यापुढे बेस्टच्या सर्व गाडय़ांच्या नामफलकांवर ‘सायन’ऐवजी ‘शीव’ असे वाचायला मिळणार आहे.

महाराष्ट्र राजभाषा अभिनियम काय म्हणतो…
शासकीय कार्यालयातून लावलेल्या पाटय़ा, फलक मराठीतून असावेत तसेच शासकीय पत्रव्यवहारात/निमंत्रणपत्रिकेत आणि इतर बाबींसंदर्भात रेल्वे स्थानके, गावांची नावे यांच्या नावाचा उल्लेख करताना मराठी भाषेत देवनागरी लिपीत नावे लिहावीत. उदा. बांद्रा असे नाव न लिहिता वांद्रे हे मूळ मराठी नाव लिहावे/वापरावे. सायन असे नाव न लिहिता शीव हे मूळ मराठी नाव वापरावे.