
पैठणच्या कार्यक्रमात महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील रोष आज पुन्हा उफाळून आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवीत धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या, तर विमानतळावर त्यांची गाडी अडवून निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुरव समाजाच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात आले होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने दोन दिवसांपासून सोलापुरात आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानतळावरून नेहरूनगर येथील कार्यक्रमस्थळी जात असताना, कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारासमोरच काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या धिक्काराच्या घोषणा देत काळे झेंडे दाखवूव ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याअगोदर विमानतळावरून मुख्यमंत्री शिंदे बाहेर पडताना बाहेर बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाच्या पदाधिकाऱयांनी गाडी थांबवून निवेदन दिले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांवरील कारवाई मागे घ्यावी व पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांवरील निलंबनाची कारवाई रद्द करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे व पदाधिकाऱयांनी केल्या आहेत.






























































