
सोलापूर शहराच्या वैभवात भर टाकणारी महापालिका आवारातील ‘इंद्रभुवन’ या ऐतिहासिक वास्तूचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, लवकरच या वैभवशाली वास्तूचे लोकार्पण होणार आहे. इंद्रभुवन ही 110 वर्षांची हेरिटेज वास्तू आहे. स्मार्ट सिटी योजनेतून पाच कोटी रुपये खर्च करून इंद्रभुवनला नवा साज चढविण्यात आला आहे. यामुळे इमारतीचे गतवैभव प्राप्त झाले आहेच, शिवाय ही इमारत अधिक मजबूतही झाली आहे. नव्या रूपातील ही ऐतिहासिक इमारत आणखी 200 वर्षे आपले सौंदर्य असेच दाखवत राहील, असा विश्वास हेरिटेज कन्सल्टंट कंपनीचे वास्तुविशारद मुनीश पंडित यांनी व्यक्त केला आहे.
मुनीश पंडित यांच्याच मार्गदर्शनाखाली गेल्या दहा महिन्यांपासून इंद्रभुवनच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. नवी दिल्ली येथील संवर्धनतज्ञ वास्तुविशारद मुनीश पंडित व शर्मिला अशोकन यांनी या नव्या वास्तूची पाहणी केली. या इमारतीत खालच्या बाजूला कलादालन, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय राहणार आहे. यामध्ये पूर्वइतिहास असलेली छायाचित्रेही लावण्यात येणार आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर सेंट्रल हॉल राहणार आहे, तर दुसऱया मजल्यावर महापालिका आयुक्तांचे कार्यालय राहणार आहे.
इंद्रभुवनचे छत बदलले आहे. आवश्यक तिथे डागडुजीही करण्यात आली आहे. नैसर्गिक पद्धतीने या इमारतीला गतवैभव प्राप्त करून देण्यात आले आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इमारतीतील जुनी लिफ्टही काढण्यात आली आहे. त्याऐवजी मागील बाजूस हायड्रोलिक लिफ्ट बसविण्यात येत आहे. इंद्रभवनच्या मागील बाजूच्या आवारात नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हिरवळीचा हरितपट्टा याठिकाणी तयार करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱयांच्या कार्यालयाची अंतर्गत सजावट होणे बाकी आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असेही मुनीश पंडित यांनी सांगितले.
सोलापूर महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱयांची कार्यालये याच इंद्रभुवन इमारतीमध्ये असतील. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, चार सहायक आयुक्त यांची दालने असतील, मुंबईनंतर सोलापूर हे महाराष्ट्रातील असे एकमेव शहर आहे, जिथे महापालिका आयुक्तांचे कार्यालय एका ऐतिहासिक वैभवशाली हेरिटेज वास्तूमध्ये असणार आहे, असेही पंडित यांनी सांगितले.






























































