
एस. टी. बसच्या चालक-वाहकांनी बेमुदत संप पुकारल्याने प्रवाशांची लूट सुरू असून, सोलापूर आगाराला दररोज 12 लाख रुपयांचा फटका बसत आहे. खासगी वाहनधारकांनी पुण्यासाठी 1500 रुपये, तर अवघ्या 30 किलोमीटरवर असलेल्या अक्कलकोटसाठी 100 रुपये दर आकारत असल्याचे दिसून येते.
राज्यासह सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्य़ांनी बेमुदत बंद पुकारला आहे. सोलापूर आगारातील 601 कर्मचारी या संपात सहभागी झाले असून, यामुळे बससेवा ठप्प पडली आहे. या संपामुळे दररोज तब्बल 12 लाख रुपयांचा तोटा होत आहे. याचा गैरफायदा खासगी बसचालक, रिक्षाचालक, जीपचालक घेत आहेत. सोलापूर ते पुणे 1500, अक्कलकोट 100 रुपये, पंढरपूरसाठी 500 रुपये, तर तुळजापूरसाठी 400 ते 500 रुपये दर घेतला जात आहे. विशेष करून भाविकांची लूट मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. बसच्या संपामुळे दिवाळी सुट्टीसाठी आलेल्या लोकांची खूप तारांबळ उडत आहे.
कोल्हापूरच्या दहा आगारांतील वाहतूक ठप्प
एसटी कर्मचाऱ्य़ांनी पुकारलेल्या संपामुळे एसटीची चाके अजूनही थांबलेली असून, प्रवासी मात्र ताटकळत बसल्याचे चित्र दिसत आहे. कोल्हापुरातही दहा आगारांतील एसटी वाहतूक ठप्प पडली आहे. दिवाळीपूर्वी आणि नंतर ऐन प्रवासी हंगामात एसटीचे दररोज 55 ते 60 लाखांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात सोमवारी कागल, गडहिंग्लज आणि गारगोटी वगळता 7 आगार बंद राहिले, तर आज कोल्हापूर, इंचलकरंजीसह दहा आगार बंद राहिले. परिणामी, जिल्ह्यातील दैनंदिन 2 लाख किलोमीटरवरील 1500हून अधिक फेऱ्य़ा बंद राहिल्या. इचलकरंजी आगारातील दैनंदिन 200 हून अधिक फेऱ्य़ा बंद झाल्या. परिणामी जिल्ह्यात एसटीची दैनंदिन पाऊण कोटीची उलाढाल ठप्प झाली होती.


























































