सोलापूर मनपाची ‘इंद्रभुवन’ इमारत होणार पर्यटन केंद्र, हेरीटेज म्हणून होणार इमारतीचे जतन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरच्या सौंदर्यात भर टाकणारी आणि महापालिकेच्या नावाने ओळखली जाणारी ‘इंद्रभुवन’ इमारत आता हेरिटेज म्हणून जतन करण्यात येणार आहे. त्यातील प्रशासकीय कार्यालयांसाठी इंद्रभुवनच्या मागेच 20 हजार चौरस फूट जागेत 7 मजली महापालिकेची नवीन इमारत बांधण्यात येत आहे. त्याचे काम पूर्ण होताच इंद्रभुवन इमारत पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे. सध्या इमारतीची स्वच्छता सुरू आहे.

सोलापूर शहरातील हेरिटेज वास्तू जतन करण्यासाठी हेरिटेज समिती स्थापन झाली आहे. या समितीच्या यादीत सोलापूर शहरातील अनेक इमारती आहेत. 108 वर्षांच्या इंद्रभुवनचा समावेश हेरिटेज वास्तूमध्ये झाला आहे. त्याचे जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या निधीतून डागडुजी करण्यात येणार आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांची कार्यालये वगळता इतर सर्व प्रशासकीय कार्यालये, इंद्रभुवनमधून मागच्या नवीन इमारतीत जाणार आहेत. त्यामुळे आता इंद्रभुवनामध्ये पर्यटकांना फिरता येणार आहे.

नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इंद्रभुवनमधील सर्व प्रशासकीय कार्यालय नवीन इमारतीत हलविण्यात येणार आहेत. एकूण जागेपैकी 12 हजार चौरस फूट बांधकाम करण्यात येत आहे. 7 मजली असलेल्या इमारतीत तळमजल्याखाली पार्किंग, तर पहिल्या दोन मजल्यांचे बांधकाम स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असून, उर्वरित तीन मजली इमारतींचा खर्च महापालिकेच्या निधीतून करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून सव्वाचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचा ठेका हैदराबादच्या कंपनीला देण्यात आला असून, कामालाही सुरुवात झाली आहे.

सध्या इंद्रभुवनच्या दोन्ही बाजूला पत्राशेड मारले असून, इमारतीची स्वच्छता सुरू झाली आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर आयुक्तांचे कार्यालय स्थायी समितीच्या कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. तर, उर्वरित अधिकाऱयांची कार्यालये प्रशासकीय इमारतीत जाण्याची शक्यता आहे.