लोकलच्या अपंगांच्या डब्यात पाच महिन्यांची चिमुकली सापडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास चर्चगेट स्थानकात फलाट क्रमांक एकवर विरारहून आलेल्या लोकलच्या अपंगांच्या डब्यात पाच महिन्यांची चिमुकली बेवारसपणे पोलिसांना मिळाली. चर्चगेट रेल्वे पोलिसांनी त्या चिमुकलीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करीत आहेत. लोकल स्थानकात येताच तेथे तैनात असलेल्या कॉन्स्टेबलला प्रवाशांनी सांगितले की, अपंगांच्या डब्यात चिमुकले बाळ आहे. त्यानुसार चर्चगेट रेल्वे पोलीस त्या डब्यात गेले असता आबोली रंगाचे अंगडे टोपटे व लंगोट घातलेले व हिरव्या रंगाच्या साडीच्या तुकडय़ामध्ये गुंडाळलेली गोरीपान पाच महिन्यांची चिमुकली सापडली. पाच ते सहा महिन्यांची ही चिमुकली आहे. त्या चिमुकलीला अशा प्रकारे डब्यात कोण सोडून गेले याचा पोलीस शोध घेत आहेत.