जत तालुक्यात जावयाने केला सासऱ्याचा खून, चारजणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पत्नीला नांदवायला पाठवीत नाही’ या कारणावरून जावयाने सासऱयाचा खून केल्याची घटना जत तालुक्यातील दरीबडची येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जावयासह त्याचा भाऊ आणि आणखी दोघे अशा चौघांवर गुन्हा दाखल केला असून, एकाला ताब्यात घेतले आहे.

अप्पासाहेब अण्णाप्पा मल्लाड (वय 46) असे मृताचे नाव असून, जावई सचिन रुद्राप्पा बळोळी व त्याचा भाऊ मीनल रुद्राप्पा बळोळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांपैकी मीनल बळोळी याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मायाश्री अप्पासाहेब मल्लाड यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली.

अप्पासाहेब मल्लाड हे आपल्या पत्नी व चार मुलांसह दरीबडची येथे संख रोडवरील मळ्यात राहतात. चार वर्षांपूर्वी मोठी मुलगी तेजश्री हिचा कर्नाटकातील ऐगळी (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील सचिन रुद्राप्पा बळोळी याच्याशी विवाह झाला होता. परंतु लग्न झाल्यानंतर महिनाभरातच पती- पत्नीत घरगुती कारणावरून खटके उडू लागले. पती सचिन चारित्र्याचा संशय घेऊन तेजश्रीला मारहाण व शिवीगाळ करीत होता. त्यामुळे तेजश्री माहेरी राहायला आली. तेव्हा मल्लाड यांनी गावातील प्रतिष्ठत लोकांच्या मध्यस्थीने तेजश्रीला सासरी पाठविले होते.

त्यानंतरही पती सचिन तिला वारंवार त्रास देत होता. सततची मारहाण व शिवीगाळीला कंटाळून तेजश्री माहेरी दरीबडचीला येऊन राहिली होती. पती सचिन याने अथणी कोर्टात दावाही दाखल केला आहे. तेजश्रीनेदेखील जत कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. पाच महिन्यांपूर्वी जत न्यायालयात तारखेसाठी आले असता, तेथेही दोघांमध्ये वाद झाला होता. जत पोलीस ठाण्यात तेजश्रीने तक्रार दाखल केली होती.

शनिवारी तेजश्रीच्या भाऊ इरगोंडा याच्या मोबाईलवर सचिनचा कॉल आला. ‘तिला नांदण्यास पाठवा; नाहीतर मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. त्याच वेळेस अप्पासाहेब मल्लाड हे ऊस पाठवायला मळ्यात गेले होते. त्यावेळी सचिन, त्याचा भाऊ मीनल व अन्य दोघे चारचाकी गाडीने तेथे आले. त्यांनी मल्लाड यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर धारदार शस्त्र्ााने डोक्यावर, मानेवर वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मायाश्री अप्पासाहेब मल्लाड यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जावई सचिन, त्याचा भाऊ मीनल व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.