
शिवतीर्थावर झालेल्या ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. या सोहळ्यास काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांनी एक पत्र लिहून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा वाहण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.
आदित्य यांनी मला प्रत्यक्ष भेटून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. काही कारणाने मी या सोहळ्यास उपस्थित राहू शकत नाही याबद्दल क्षमस्व असे नमूद करतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नवी इनिंग सुरू करत असताना माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा अशा भावना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष अशावेळी एकत्र आले आहेत ज्यावेळी भाजपा दहशत पसरवत आहे. सध्याची देशातली राजकीय स्थितीही चांगली नाही. अर्थव्यवस्था कोसळली आहे. शेतकऱयांना या सगळ्याचा मोठा फटका बसला आहे. मात्र महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रात चांगला कारभार चालेल याची मला खात्री आहे, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे समान किमान कार्यक्रमावर एकमत झाले आहे. लोकांनीही महाविकास आघाडी स्वीकारली आहे. लोक आपल्याला साथ देतील असाही विश्वास मला वाटतो. आपल्या सगळ्यांचे प्रयत्न जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहात याचा आनंद आहे. त्यासाठी शुभेच्छा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरद्वारे शुभेच्छा
‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन. मला खात्री आहे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते अविरत काम करतील,’ अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिल्या आहेत.


























































