हिंदुस्थानी फलंदाजांवर ‘दादा’ खुश; म्हणाला, संघातले स्थान टिकवण्यासाठी…

864

हिंदुस्थानी क्रिकेट संघ विंडीजविरुद्धची टी-20 मालिका जिंकणार याचा मला विश्वास होता. पण संघातील प्रमुख फलंदाजांनी आपला नैसर्गिक खेळ करीत संघाला विजयी केले. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल. राहुल अथवा संघातील नवोदित खेळांडूंपैकी कुणीही संघातील जागा टिकवण्याच्या हेतूने रटाळ अथवा सुरक्षात्मक फलंदाजी केली नाही याचा मोठा आनंद मला झाला आहे, अशा शब्दात हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी टीम इंडियाच्या शानदार विजयाचे कौतुक केले आहे.

आयसीसी टॉप टेन रँकिंगमध्ये 3 हिंदुस्थानी, कोहली 5 स्थानांची झेप घेत 10व्या स्थानी

टीम इंडियाचे मालिका जिंकणे माझ्यासाठी तितकेसे विशेष नव्हते. पण हैदराबादच्या पराभवानंतर मालिकेत विजय मिळविण्यासाठी कोहली आणि कंपनीने मुंबईत जो जिगरबाज खेळ केला तो निश्चितच कौतुकास पात्र होता. विशेष म्हणजे संघातील सर्व फलंदाज जिंकण्याच्या अपूर्व निर्धाराने मैदानात फलंदाजी करताना दिसले. ही कामगिरी निश्चितच माजी विश्वविजेत्या हिंदुस्थानी संघासाठी भूषणावहच म्हणायला हवी, अशी कौतुकाची थाप बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी टीम इंडियाच्या पाठीवर दिली. टीम इंडियाने विश्वविजेत्या विंडीजविरुद्धची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकलीय याहून आनंदाची गोष्ट कोणती, असेही गांगुली पुढे म्हणाले.

‘कोणतेही भय न बाळगता प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करणे हि कामगिरी या मालिकेत विराट आणि कंपनीला चांगलीच जमलीय. संघातील जग टिकविण्यासाठी सुरक्षापूर्ण खेळ आपल्या कोणत्याही फलंदाजाने केला नाही. खूप छान टीम इंडिया!’, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या