दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड निलंबित, आयसीसीकडून मान्यता काढून टाकण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंतर्गत वादविवाद, नकारात्मकता, कारभार चालवण्याबाबत व्यक्त करण्यात आलेली शंका या सर्व कारणांमुळे क्रिकेट दक्षिण आफ्रिका या बोर्डाचा पाय खोलात गेला आहे. दक्षिण आफ्रिकन स्पोर्टस् कॉन्फेडेरेशन आणि ऑलिम्पिक समितीकडून (एसएएससीओसी) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे आयसीसीकडून त्यांना देण्यात आलेली मान्यता काढून घेण्यात येण्याची भीतीही यावेळी निर्माण झाली आहे.

एसएएससीओसी प्रभारी सीईओ रवी गवंडर यावेळी म्हणाले, दक्षिण आफ्रिकन बोर्डातील अंतर्गत वादविवाद, नकारात्मकता, कारभार चालवण्याबाबत व्यक्त केलेली शंका या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे भविष्यात या बोर्डात अधिक कार्यक्षम, प्रभावी पद्धतीने काम केले जाईल, असेही ते पुढे स्पष्टपणे म्हणाले. तसेच क्रिकेट दक्षिण आफ्रिकन बोर्डाला एक महिना दूर राहायला सांगण्यात आले आहे. आमची टीम या कालावधीत या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करील.

आयसीसीलाही चिंता
रवी गवंडर यावेळी म्हणाले, क्रिकेट दक्षिण आफ्रिका हे बोर्ड ज्या प्रकारे चालवले जात होते त्यावर आयसीसीकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयावर त्यांच्याकडून कोणताही विरोध दर्शवण्यात आलेला नाही. तसेच या देशात आमच्या अधिपत्याखाली सर्व खेळाच्या संघटना आहेत. हे आयसीसीलाही माहीत आहे. आमच्या टीमकडून रिपोर्ट तयार करण्यात आल्यानंतर आयसीसीशी चर्चा करू. त्यानंतरच अंतिम निर्णय घेऊ, असेही रवी गवंडर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.