
सामना प्रतिनिधी । मुंबई
आपल्या देशात राष्ट्रदेव ही संकल्पनाच नाही. हे लक्षात घेता देशात राष्ट्रदेव म्हणून सर्वगुणसंपन्न विद्येच्या गणपतीदेवाला मान्यता मिळावी, अशी मागणी आध्यात्मिक गुरू भाईश्री रमेशभाई ओझा यांनी शुक्रवारी भारतीय छात्र संसदेच्या व्यासपीठावरून केली. गणपतीमध्ये अनेक गुण आहेत. हे गुण आपल्या देशातल्या नेत्यांमध्ये येण्याची गरज आहे, असेही ओझा म्हणाले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीने नवव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटन सत्रात ओझा बोलत होते. आपला देश धर्मनिरपेक्ष असला तरी त्याला राष्ट्रदेवाची आवश्यकता आहे. याचा अर्थ असा नाही की, ही गोष्ट धार्मिक आहे. राजकारण्यांनी गणपतीप्रमाणेच लोकांच्या समस्या आणि प्रश्न ऐकून त्या सोडवल्या पाहिजेत, तर त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी वाणीचे स्वातंत्र्य देणे गरजेचे असल्याचे मत ओझा यांनी व्यक्त केले.



























































