जागतिक नेमबाजी स्पर्धा , हिंदुस्थानच्या मेराजचा ऐतिहासिक ‘सुवर्णवेध’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरियात सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत हिंदुस्थानच्या मेराज अहमद खानने नवा इतिहास घडवला आहे. त्याने देशाला प्रथमच पुरुषांच्या स्किट प्रकाराचे सुवर्णपदक मिळवून देत कोरियात हिंदुस्थानी तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. दोन ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱया मेराजने याआधी 2016च्या रियो विश्वचषक नेमबाजीत स्किट प्रकारात हिंदुस्थानला रौप्यपदक मिळवून दिले होते. आता त्याने आपल्या पदकाचा रंग बदलत सोनेरी केला आहे.

आजच्या पाचव्या सुवर्णपदकासह हिंदुस्थानी संघाने या विश्वचषक नेमबाजी पदकपालिकेत आपले टॉपचे स्थान कायम राखले आहे. हिंदुस्थानी नेमबाजी पथकाने या स्पर्धेत आतापर्यंत 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कास्यपदकांसह एकूण 13 पदके पटकावत आतापर्यंत पहिले स्थान पटकावले आहे. 8 पदकांसह यजमान कोरिया संघ दुसऱया तर 3 सुवर्णपदकांसह सर्बिया संघ तिसऱया स्थानी राहिला आहे. यजमान कोरियाने 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कास्यपदकांसह 8 पदकांची कमाई केली आहे.

डबल ऑलिम्पियन मेराजची कमाल

हिंदुस्थानसाठी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱया मेराज अहमद खानने आज नेमबाजी रेंज गाजवले. त्याने स्किट प्रकारात 40 पैकी 37 शॉट्स यशस्वीपणे लक्ष्यावर डागले. यजमान कोरियाच्या मिसु किमने 36 गुण तर ब्रिटनच्या बेन लीवेलिनने 26 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरचा रहिवासी असलेल्या मेराज गेली 15 वर्षे आंतरराष्ट्रीय नेमबाजीत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्याने देशासाठी राष्ट्रकुल, आशियाई नेमबाजीसह अन्य स्पर्धांत देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत.