
सामना प्रतिनिधी, मुंबई
एसटीच्या कर्मचाऱ्याना त्यांच्या जुलैच्या पगारापासून नवीन वेतनवाढ लागू होणार आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्याच्या २०१६-२० च्या वेतन कराराला राज्य सरकारने मंजुरी दिली असल्यामुळे जुलै महिन्याच्या पगारातही वाढ दिसणार आहे.
एसटी कर्मचाऱ्याचा वेतन करार दर चार वर्षांनी होतो. परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ५ जून रोजी ४८४९ कोटींचा वेतन करार जाहीर केला. या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्याचा पगार हा ५ ते १२ हजारांपर्यंत वाढणार आहे. ज्या कर्मचाऱ्यानी तीन वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केले आहे त्यांना दोन अतिरिक्त वेतनश्रेणी तर पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केलेल्या कर्मचाऱ्याना चार अतिरिक्त वेतनश्रेणी या वेतन करारामुळे मिळणार आहेत. ज्यांनी पाच वर्षे कनिष्ठ श्रेणीत काम केले आहे त्यांच्या पगारात आठ हजारांची वाढ होणार आहे.
































































