
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिशय खरमरीत भाषेत पत्र पाठवले आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील भ्रष्टाचार व चुकीची कामे बंद करून कारवाई करावी अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात दुष्काळी संकटाशी सामना करण्यासाठी लागणार्या उपाययोजनांची टिप्पणीही पाठवली आहे. त्यात त्रुटींवर अचूक बोट ठेवले आहे.
लोकांमध्ये अस्वस्थता
दुष्काळामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर होत असून लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आताची दुष्काळी स्थिती भविष्यातील संकटाची नांदी आहे असा इशारा पवार यांनी दिला आहे.
जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार
राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा मोठा गवगवा केला आहे, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. या योजनेतील चुकीची कामे बंद करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पाणी साठवणीची जुनी कामे तातडीने हात घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.



























































