
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठातील वकील संघाने आजपासून काम बंद आंदोलनास प्रारंभ केला आहे. न्यायालयीन प्रशासनाने आवश्यक ती विकासकामे पूर्ण न करता फौजदारी प्रकरणे चालवली जाणारी न्यायालये नव्या इमारतीत स्थलांतरित केल्याच्या निषेधार्थ खंडपीठ वकील संघाने आज हे पाऊल उचलले. यामुळे खंडपीठातील न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते.
छत्रपती संभाजीनगर येथे खंडपीठाचे अतिशय सुंदर इमारत आहे. परंतु ती आता वाढत्या कामाच्या व्यापामुळे अपुरी पडू लागल्याने न्यायप्रशासनाने टप्पा क्रमांक दोन अंतर्गत नवीन इमारत उभारली आहे. परंतु, जुन्या इमारतीतून नवीन इमारतीत जाण्यासाठी रस्ता, स्काय ओव्हर, पोलीस कामकाजाची दालने वगैरे अनेक सुविधा अद्याप अपूर्णच आहेत. सरन्यायाधीश संभाजीनगर येथे येऊन गेल्यानंतर त्यांच्या सूचनेनंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी दिलेल्या निर्देशानुसार येथील प्रशासकीय न्यायमूर्तींनी नवीन दालनात फौजदारी न्यायालये व त्यांचे कामकाज स्थलांतरित केले. सुविधा देण्याआधीच न्यायालये स्थलांतरित केल्यामुळे खंडपीठ वकील संघाने आधी न्यायालयीन प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व आपल्या निवेदनावर विचार होत नसल्याचे पाहून वकील संघाने आज कामकाजात सहभागी न होण्याचे आंदोलन सुरू केले.
फौजदारी न्यायालये 3 ऑक्टोबरपर्यंत जुन्या इमारतीमध्ये सुरू न झाल्यास 4 ऑक्टोबरपासून खंडपीठातील दिवाणी आणि फौजदारी कामकाजात वकिलांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. वकिलांच्या ठरावाची प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे आजपासून वकिलांनी खंडपीठातील दिवाणी व फौजदारी कामकाजात सहभागी होऊ नये, असे आवाहन वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नरसिंह एल. जाधव आणि सचिव अॅड. राधाकृष्ण के. इंगोले यांनी केले आहे.
जुन्या ईमारतमध्ये 15 कोर्टरूम असून त्यातील 4 कोर्टरूम खाली आहेत. त्याठिकाणी बसण्यासाठी न्यायाधीश नाहीत. आता नवीन ईमारतमध्ये 12 कोर्टरूम बांधण्यात आले आहेत. ज्यात फौजदारी प्रकरणाचे 5 कोर्टरूम स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच दिवाणी न्यायदालने जुन्या ईमारतीत ठेवण्यात आले आहे. या दोन्ही ईमारतमध्ये पायी जाण्यासाठी किमान आठ ते दहा मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे एकाचवेळी वकिलाचे फौजदारी व दिवाणी प्रकरण असल्यास त्याने तिथे कसे उपस्थित राहावे, असा प्रश्न वकिलांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वच कोर्ट एकाच ठिकाणी ठेवावे अशी मागणी वकिलांची होती. मग ते जुन्या ईमारतीमध्ये ठेवा किंवा नवीन ईमारतीमध्ये ठेवा, पण एकाच ठिकाणी ते असले पाहिजे अशी मागणी वकील करत आहे.
























































