ऐन परीक्षेतही विद्यार्थ्याने केलेल्या प्लाझ्मा दानामुळे मृत्युशय्येवरील रुग्णाला नवजीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने सर्वांना घाबरवून सोडले आहे. शेजारची व्यक्ती पॉझिटिव्ह आली तरी तिच्यापासूनचे अंतर सोशल डिस्टन्सिंगपेक्षा शेकडो पट जास्त ठेवले जाते. सर्वांच्या सुरक्षेपेक्षा वैयक्तिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्याचा स्वार्थ साधला जात आहे. आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित राहिले पाहिजे असा विचार करणाऱयांची संख्या सध्या वाढली आहे. पण अशा अंधःकारातही आशेचे किरण निर्माण करणारेही आहेत. वरळीच्या सोहम शिंदे या तरुणाने कृतीमधून ते दाखवून दिले. परीक्षेत व्यस्त असतानाही वेळात वेळ काढून त्याने केलेल्या प्लाझ्मा दानामुळे मृत्यूशय्येवरील रुग्णाला जगण्याची उभारी मिळाली.

वरळी येथील अग्निशमन दलाच्या वसाहतीत हे शिंदे कुटुंब राहते. सोहमचे वडील हे अग्निशमन अधिकारी आहेत. आई शिक्षिका तर मोठी बहिण फिजियोथेरपिस्ट आहे. सोहमची बहिण वरळीतील एनएससीआय डोम कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा करते.

गेल्या गुरुवारी त्याला वरळीच्या युवा सेनेच्या प्लाझ्मा वॉर रुममधून फोन आला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने ती सेवा सुरू करण्यात आली आहे. वरळी डोम कोविड सेंटरमधील रुग्णाला प्लाझ्माची निकड असल्याचे सोहमला सांगण्यात आले. रुपारेल महाविद्यालयात बीएच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱया सोहमची परीक्षा सुरू आहे. सकाळी 11 ते साडेबाराच्या कालावधीत त्याला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. प्लाझ्मा दानासाठी फोन येताच सोहमने क्षणात होकार दिला. गुरुवारी सकाळी ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर सोहम वरळी डोम कोविड सेंटरला गेला. तिथे त्याने प्लाझ्मा दान केला. युवासेना विभाग अधिकारी संकेत सावंत यांनी याकामी महत्वाची भूमिका बजावली.

कोरोनामधून बरा झाल्यानंतरच मी प्लाझ्मा दान करायचे ठरवले होते. योगायोगाने त्या दिवशी अचानक त्यासाठी फोन आला. माझी परीक्षा सुरू आहे पण प्लाझ्मा दानही तितकेच महत्वाचे होते. रुग्णाचे प्राण वाचणार होते. जीवघेण्या संकटात कुणाच्या तरी मदतीला धावून जाता आले याबद्दल आनंद आहे.
– सोहम शिंदे