काहीही खाण्यापेक्षा, ‘अर्थ’पूर्ण खा! शेतकऱ्याची लेक देतेय मातीशी ‘कनेक्ट’ व्हायचा संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतात काम करायचे आणि स्वतःचे अन्न स्वतःच पिकवायचे हा संस्कार नाशिकच्या सुचेता भंडारे या शेतकरी कन्येवर बालपणापासून झालाय. त्यामुळे काहीतरी मातीशी ‘कनेक्ट’ राहून करता येईल यादृष्टीने तिने विचार केला. तिने शेतकऱयांना नाचणीचे पीक घ्यायला प्रेरित करून नाचणीचे पौष्टिक लाडू बनवायला सुरुवात केली. या लाडवांना तिथे ‘अर्थपूर्ण’ असे नाव दिले. अल्पावधीतच सुचेताने नाचणीच्या लाडूंचा ब्रँड उभा केला. ‘काहीही खाण्यापेक्षा अर्थपूर्ण खा’ हा संदेश देण्यात सुचेता यशस्वी ठरली आहे, असे म्हणता येईल.

लोकांना पौष्टिक, नैसर्गिक पदार्थ उपलब्ध करून देणे या उद्देशाने सुचेता भंडारे हिने ‘अर्थपूर्ण’ कंपनी सुरू केली. सुचेता मूळची नाशिकच्या वडनेर भैरव गावची. लग्नानंतर ती गोव्यात राहायला आली. ती शिकायला काही वर्षे पुण्यात होती. तिने बी.एड. केले आहे. पुण्यात असताना तिला हेल्दी स्नॅक्स मिळवण्यात अडचण यायची. वडापाव, समोसा असं खावं लागायचं. अशा वेळी सुचेताला बालपणीचे दिवस आठवायचे. आजीच्या हातची नाचणीची पेज खाऊन ती मोठी झाली होती. पौष्टिक लाडू, गूळ- शेंगदाणं तिचं आवडतं खाणं. मोठं झाल्यावर अशा खाण्यापासून ती दूर गेली.

सुचेता सांगते, आज लोकांना पारंपरिक रेसिपी बनवायला वेळ नसतो, पण या पौष्टिक रेसिपी पुढच्या पिढय़ापर्यंत पोचल्या पाहिजेत, त्या टिकल्या पाहिजेत या उद्देशाने मी नाचणीचे लाडू बनवायला सुरुवात केली. 2019 ला ‘अर्थपूर्ण’ कंपनीची नोंदणी करून ऑगस्ट 2020 पासून काम सुरू केलं. आम्ही चार प्रकारचे नाचणीचे लाडू बनवतो. साधे गुळाचे, खजुराचे, ‘विगन’चे आणि मिश्र डाळींचे. साधारण दीड महिना तरी हे लाडू टिकतात. ‘हेल्थ’ आणि ‘हायजिन’ स्टॅण्डर्ड टिकवण्याचा तिचा प्रयत्न आहे. म्हणूनच नाचणीच्या लाडवांच्या प्रत्येक बॅचचे लॅबमध्ये सॅम्पल टेस्टिंग होतं. सुचेता सांगते, मी बी.एड. केले असल्याने पुढे शिक्षणक्षेत्रात काम करावे असे घरच्यांना वाटत होतं, पण आईबाबांना शेतात काम करताना बघून माझा शेतीशी ‘कनेक्ट’ व्हायचा निर्धार पक्का व्हायचा. त्यातूनच ‘अर्थपूर्ण’चे बीज माझ्या मनात रोवलं गेलं.

शेतकऱयांचे नेटवर्क उभारले
z ‘अर्थपूर्ण’साठी सुचेता काही शेतकऱयांकडून नाचणी विकत घेते. तिने पुण्यातील काही शेतकऱयांना नाचणीचे पीक घेण्यासाठी प्रेरित केले. पूर्णपणे ऑर्गनिक पद्धतीने नाचणीची शेती केली जाते. सुचेता शेतकऱयांकडून थेट नाचणी घेत त्यांना पिकाचा योग्य मोबदला मिळतो. सुरुवातीला शेतकऱयांना नाचणीचे पीक घेण्याबद्दल समजवावे लागले. कारण विशिष्ट पिकं घेण्याकडे शेतकऱयांचा पारंपरिक कल असतो. आज ‘अर्थपूर्ण’साठी तिने नाचणी पिकवणाऱया शेतकऱयांचे नेटवर्क तयार केलंय.

z ‘अर्थपूर्ण’ कंपनीत सध्या सात बायका कामाला आहेत. महिन्याला नाचणीचे साधारण 200 ते 250 किलो लाडू तयार केले जातात. मुंबई, पुणे, दिल्ली, कर्नाटक येथून नाचणीच्या लाडवांना चांगली मागणी आहे. 30 टक्के ऑर्डर रिपीट असल्याचे सुचेता भंडारे सांगते. त्यांचे पॅकिंगही वैशिष्टय़पूर्ण पुठ्ठय़ाच्या बॉक्समध्ये असते. ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा हे आणखी एक हेल्दी प्रोडक्ट तिने सुरू केले आहे. ‘अर्थपूर्ण’ या इन्स्टाग्राम पेजवरून लाडवांची ऑर्डर करता येईल.