
मुंबईतल्या चौपाटय़ा आणि भेळपुरी-पाणीपुरी व गारेगार कुल्फी हे समीकरणच आहे. पण कोरोनाच्या भीतीमुळे कुल्फीवाल्यांची कुल्फी वितळण्याची वेळ आली आहे. कारण कुल्फीच्या शौकिनांमध्ये कोरोना-सर्दी खोकल्याच्या भीतीने घर केले आहे. त्यामुळे डोक्यावर वजनदार टोपली घेऊन चौपाटीवर फिरणाऱया पारंपरिक मराठमोळ्या कुल्फीवाल्यांचा धंदा थंडावला आहे.
बहुराष्ट्रीय आइस्क्रीम कंपन्यांच्या कुल्फीला टक्कर देत मुंबईतले कुल्फीवाले टिपून राहिले. पण कोरोना, लॉकडाऊननंतर अनलॉक, आता पुन्हा कोरोनाचे संकट यामुळे इतरांप्रमाणे मुंबईतले कुल्फीवालेही चिंतेत पडले आहेत. रंगपंचमीला रंगात न्हाऊन आंघोळीला समुद्रावर येणाऱयांची संख्या मोठी असते, पण यंदा कोरोनाच्या नियमांमुळे चौपाटय़ांवर शुकशुकाट होता. त्यामुळे आजच्या दिवशीही धंदा मंदा होता. मुंबईच्या चौपाटय़ा, उद्याने आणि पार्पमध्ये डोक्यावर चाळीस किलो वजनाची टोपली घेऊन फिरणारे कुल्फीवाले कडक उन्हाळ्यातही गारठले आहेत.
रंगपंचमीच्या दिवशीही नेहमीप्रमाणे डोक्यावर कुल्फीची टोपली घेऊन निघालेले रामदास चव्हाण दादर चौपाटीवर भेटले. सध्या कुल्फीचा धंदा कसा आहे असे विचारले असता, कोरोना, सर्दीचे कारण देत काही लोक कुल्फी खात नाहीत, पण आताही कुल्फी खाणारे लोक आहेत म्हणून आमचे निभावते. लॉकडाऊनच्या काळात अनेक कुल्फीवाले गावी गेले. काहींनी शेती तर काहींनी नोकरी पत्करली. आमच्यासारखे काही लोक मात्र अजूनही कुल्फीचा व्यवसाय करतात. पण आमची पुढची पिढी कुल्फीचा व्यवसाय करू शकणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भोरचे कुल्फीवाले
पूर्वी कुल्फीचा व्यवसाय जोरात होता. दादर-सैतानचौकीतील बर्फाच्या कारखान्यात बर्फासाठी कुल्फीवाल्यांना एक तास रांग लावावी लागत होती. आता कुल्फीवाल्यांची संख्या कमी झाली आहे. व्यवसाय कमी होत चालल्याने अनेकांनी गावची म्हणजे पुणे जिह्यातल्या भोरची वाट धरली. कुल्फीवाले हे भोरशिवाय दुसरे कोणी असू शकत नाहीत, असे रामदास चव्हाण अभिमानाने सांगतात.
चौपाटय़ांवरची गर्दी ओसरली
उन्हाचा तडाखा वाढल्यावर अंगाची लाहीलाही थांबवण्यासाठी लोक चौपाटीवर येत. प्रेमी युगुले चौपाटीवर संध्याकाळी येत असत. हातात कुल्फीची कांडी व मावळत्या सूर्याला साक्षी ठेवत भावी संसाराची स्वप्ने रंगवत, पण आता सर्वच बदलले आहे. सध्या मुंबईचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे कडाक्याच्या उन्हाळ्याही कुल्फीचा धंदा थंड पडला आहे.





























































