
महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्राविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणारे आणि महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगून वाद पेटवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची तक्रार खासदारांनी शहांकडे केली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा राज्याच्या वतीने ईडी सरकारमधील लोकसभा सदस्यांपैकी कोणीही सीमाप्रश्न अथवा इतर प्रश्न मांडले नसतील तर ते राज्याचे दुर्दैव आहे, अशा कठोर शब्दात सुप्रिया सुळे यांनी ईडी सरकारवर टीका केली.
ईडी सरकारमधील सत्तेत असलेल्या सदस्यांपैकी एकाही सदस्याने पार्लमेंट सुरू होऊन तीन दिवस उलटून देखील राज्यातील कोणत्याही विषयाबद्दल बोललेलं माझ्या कानावर आलेलं नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज तसेच राज्यातील इतर प्रश्नांवर अतिशय असंवेदनशीलपणे ईडी सरकार वागत आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
Maharashtra-Karnataka border row ‘मविआ’च्या खासदारांनी अमित शहांची भेट घेतली, बैठकीत काय चर्चा झाली?
या चर्चेमध्ये सर्वपक्षीय सहभाग अपेक्षित होता जर एकत्रितपणे गेलो असतो तर जास्त योग्य ठरले असते. तसेच या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करायला हवी होती. यापूर्वी अशा काही घटना घडल्या की तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षपात न करता राज्य ही पहिली अशी भूमिका घेतली. मात्र विद्यमान सरकारमधील मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री राज्याच्या हितासाठी कुठेही विरोधी पक्षाला विश्वासात घेताना दिसत नाही. सीमाप्रश्नाचा वाद चिघळला त्यावेळी पहिले चोवीस तास राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नाहीत व चूकीच्या गोष्टींची पाठराखण करत आहेत हे राज्याचे दुर्दैव आहे असे त्या म्हणाल्या.






























































