स्पेनमध्ये होणार मराठमोळ्या ढोलताशांचा गजर, ‘स्वरगंधार’ उंचावणार महाराष्ट्राची शान!

189

रश्मी पाटकर, मुंबई

मराठमोळ्या पारंपरिक ढोल ताशांच्या संस्कृतीला आजच्या तरुणाईने आपलंसं केलं आहे. डीजे आणि डॉल्बीला सणांतून बाजूला सारत पारंपरिक वाद्य शिकून त्याचा गजर करण्याकडे तरुणांचा कल वाढत असल्याचं चित्र दिसायला लागलं आहे. त्याचा परिपाक म्हणून आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात वेगवेगळी ढोलताशा पथकं निर्माण झाली आहेत. अशाच एका पथकाने सातासमुद्रापार भरारी घेतली असून आता स्पेनवासीयांना ढोलताशांचा गजर ऐकवायला ते सिद्ध झालं आहे.

दिनांक २६ ते ३० जून २०१८ रोजी स्पेन येथे होणाऱ्या ‘युरोपियन फोकलोअर फेस्टिव्हल’तर्फे आयोजित ‘फोक म्युझिक फेस्टिव्हल’साठी दहिसर येथील ‘स्वरगंधार’ या ढोलताशा पथकाची निवड झाली आहे. स्वरगंधार पथक आपल्या कलेचे सादरीकरण स्पेनवासीयांसमोर करणार आहे. युरोपियन फोकलोअर फेस्टिव्हल हा महोत्सव दरवर्षी जगभरातल्या लोककलांना एकाच मंचावर आणून त्यांचे सादरीकरण करायची संधी देत असतो. यंदा हा मान स्वरगंधारला मिळाला असून त्यासाठी पथकाचे ढोल आणि ताशेकरी सज्ज झाल्याचे पथकाचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रसाद पिंपळे यांनी सांगितलं आहे.

चार वर्षांपूर्वी १४ डिसेंबर २०१४ रोजी प्रसाद पिंपळे यांनी स्वरगंधार या ढोल ताशा पथकाची स्थापना केली. सध्या या पथकात वय वर्ष ८ ते ३५ या गटातील १४० युवक-युवती सहभागी आहेत. दरवर्षी नवीन दाखल होणाऱ्या ढोलताशा प्रेमींना या पथकात विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. अवघ्या चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पथकाने संपूर्ण मुंबईत नावलौकिक मिळवला असून आता ते स्पेनवासीयांना ढोलाच्या झिंगेचा आणि ताशाच्या तर्रीचा अनुभव देण्यास सिद्ध झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या