
ही सोलापुरातील अतिशय उच्च नागरिकांची सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये सोलापूर शहर पोलिसांनी छापा मारून टी-20 विश्वचषकाच्या लढतींवर सट्टा घेणाऱ्या चार उच्चशिक्षित तरुणांना अटक केली आहे. यावेळी दोन लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विजापूर नाका पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या भरारी पथकाने केली आहे.
अमोघ आनंद साखरे (वय 24, रा. महादेव गल्ली, मंगळवार पेठ), नागेश सुभाष येळमेली (वय 33, रा. शाहीरवस्ती, भवानी पेठ), शिवाजी पांडुरंग हक्के (वय 32, रा. मराठावस्ती, भवानी पेठ), प्रभाकर राजशेखर उपासे (वय 28, रा. पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जुळे सोलापुरातील ‘शालिनी ऑर्केड’ या अपार्टमेंटमध्ये टी-20 विश्वचषकाच्या सेमिफायनलवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्तांच्या भरारी पथकाला मिळाली होती. भरारी पथकाने विजापूर नाका पोलीस ठाण्याची मदत घेत बुधवारी रात्री या अपार्टमेंटवर छापा टाकला. यावेळी चौघांना ताब्यात घेण्यात आले. हे चौघेही उच्चशिक्षित आहेत. या कारवाईत 17 मोबाईल, 2 लॅपटॉप, 1 नोटबुक, 1 हॉटमशीन, 14 हजार रुपयांची रोकड असा दोन लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तरुणांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनकुडे-पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जीवन निर्गुडे, दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुंखे, नरेंद्र नक्का यांनी ही कारवाई केली.

























































