पोस्टातील गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई करा, आमदार  वैभव नाईक यांची  सूचना

66

सामना प्रतिनिधी । कुडाळ

कुडाळ पोस्ट कार्यालयात काही अल्पबचत एजंन्टामार्फत  लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पोस्ट कार्यालयात गुरुवारी  भेट देऊन  ओरोस डाकविभागाचे सहाय्यक अधीक्षक जी. एस. राणे व पोस्टमास्तर कदम यांच्याकडून या सर्व प्रकाराची माहिती घेतली. काही अल्पबचत एजंन्टाकडून हा गैरव्यवहार झाला असल्याने पोस्ट विभागाने एजंटावर  खापर फोडून आपली जबाबदारी झटकू नका, या प्रकरणाची सखोल चौकशी करून  दोषींवर कारवाई करा आपणही वरिष्ठ पातळीवर याबाबत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करतो असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

बनावट पासबुक किंवा जुन्या संपलेल्या पासबुकचा पुन्हा वापर करून कुडाळ पोस्टाच्या  ग्राहकांचे पैसे पोस्टात गुंतवल्याचे भासवून हा गैरप्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे. सहाय्यक अधीक्षक जि. एस. राणे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पातळीवरून  नेमलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. काही ग्राहकांचे पैसे संबंधित एजंट नी  पोस्टात गुंतवले नसल्याचे चौकशीत समोर आले असल्याने आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ पोस्ट कार्यलयात भेट देऊन संबंधित अधिकार्‍यांना सूचना  केल्या.

पोस्टात विश्वासाने लोक पैसे गुंतवतात त्यामुळॆ त्यांच्या पैशांची जबाबदारी हि पोस्ट खात्याची आहे. त्यामुळे लवकरच या गैरव्यवहाराचा छडा  लावून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी दिल्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या