
अभिनेत्री तृषा हिच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तामीळनाडूतील द्रमुक नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात तमिळगा वेत्री कळघम पक्षाच्या महिला आघाडीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कायद्याच्या सहा कलमांखाली गुन्हा दाखल करत त्यांना आज अटक केली. अटक टाळण्यासाठी उदयनिधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या प्रकरणावर सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.
सोमवारी तंजावर येथे कावेरी पाणी वादाबाबत आयोजित एका रॅलीदरम्यान, उदयनिधी हे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर टीका करत असतानाच गर्दीतून कार्यकर्त्यांनी ‘तृषा, तृषा’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावर उदयनिधी म्हणाले, पाणी इतरत्र पोहोचो वा न पोहोचो, पण ते तिथे मात्र नक्कीच पोहोचले पाहिजे,’ असे म्हटले. परंतु नंतर त्यांनी स्पष्ट केले की, ते कावेरीच्या पाण्याबद्दल बोलत होते. त्यांच्या या विधानाबद्दल टीव्हीकेच्या नेत्यांनी म्हटले की, हे विधान दुहेरी अर्थात बोलले आहे. तसेच ते महिलांचा अनादर करणारे आहे, असे म्हटले. याच आरोपाच्या आधारे उदयनिधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आज त्यांना अटक करण्यात आली आहे. तर मी कोणाचेही नाव घेतले नाही, तसेच कोणाबद्दलही वाईट बोललो नाही, असे उदयनिधी म्हणाले.
उदयनिधी समर्थकांनी घराबाहेर जमा होऊन पोलिसांच्या कारवाईविरुद्ध निदर्शने केली. यावेळी काही वेळ झटापट आणि घोषणाबाजी झाली.
आठ तासांनंतर सुटका
चौकशी केल्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांना आठ तासांनंतर पोलिसांनी सोडले. यानंतर डीएमकेचे प्रमुख आणि उदयनिधी यांचे वडील एम. के. स्टॅलिन यांनी तामीळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेवर सडपून टीका केली. अहंकार विनाशाकडे घेऊन जातो… सरकारला त्या आरोपांचे उत्तर देण्यात अपयश आल्याने आणि कावेरी मुद्दय़ावरून लक्ष हटवण्यासाठी उदयनिधी यांना अटक करण्यात आली, असे एमके स्टॅलिन यांनी म्हटले.






























































