
सामना ऑनलाईन । मुंबई
मनमानी पद्धतीने भाडे वसूल करणाऱ्या काळीपिवळी टॅक्सीचालकांना प्रवासी वैतागले आहेत. मीटर असूनही मनाला येईल ते भाडं सांगत डोंबिवलीतील एका दांपत्याला टॅक्सीचालकाने लुटल्याची घटना समोर आली आहे. अश्विन आणि त्यांच्या पत्नी स्मिता पटनायक हे ओडीशावरून एलटीटी इथे उतरले होते. तिथून डोंबिवलीला येण्यासाठी त्यांनी जी टॅक्सी केली त्या टॅक्सीचालकाने त्यांच्याकडून ३ हजार रूपये जबरदस्ती वसूल केले आहेत.
गुरुवारी पटनायक दांपत्य एलटीटी स्थानकात उतरलं होतं. त्यांनी डोंबिवलीसाठी एक टॅक्सी ठरवली. या टॅक्सीमध्ये आधीच एक माणूस बसलेला होता. हा माणूस आपला मित्र असून त्याला रस्त्यातच उतरायचं आहे असं सांगून टॅक्सीचालकाने या दांपत्याला टॅक्सीत बसवलं. डोंबिवलीला पोहोचल्यानंतर टॅक्सीचालकाने त्यांना ३ हजार रूपये भाडं झाल्याचं सांगताच हे दोघेही जण उडाले. इतके पैसे कसे होतील असा जाब विचारताच या टॅक्सीचालक आणि त्याच्या साथीदाराने या दांपत्याला धमकावत पैसे वसूल केले. अस्विन यांनी भीतीपोटी पैसे दिले मात्र या टॅक्सीचा फोटो काढायला ते विसरले नाही. त्यांनी हा फोटो पोलिसांना दाखवला आणि सगळा प्रकार कथन केला. मात्र पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. अश्विनने आरटीओत या प्रकरणाची ऑनलाईन तक्रार केली. यावर टॅक्सी चालकावर योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच गरज पडल्यास चालकाचे लायसन्स सुद्धा रद्द करण्यात येईल असं आश्वासन आरटीओतर्फे अश्विन यांना देण्यात आलं आहे.
























































