आमदार निवासात शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; विधानसभाध्यक्षांनी समजूत काढली, अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्रालयाशेजारी असणाऱया आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न गजानन खैरे या शिक्षकाने केला. गेली पंधरा वर्षे पगाराच्या अनियमिततेमुळे त्रस्त असल्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले. विधानसभाध्यक्ष नाना पटोले तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी येऊन मध्यस्थी केल्याने शिक्षक आत्महत्येपासून परावृत्त झाला आणि मोठा अनर्थ टळला.

राज्य मंत्रिमंडळ मंडळ बैठकीच्या दिवशीच संध्याकाळी गजानन खैरे या शिक्षकाने मंत्रालयाशेजारील आमदार निवासाच्या चौथ्या मजल्याच्या छज्ज्यावर चढून आत्महत्येचा इशारा दिला. पोलीस अधिकाऱयांनी मेगाफोनवरून या शिक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गेली पंधरा वर्षे आपल्याला अनियमित पगार मिळतो. गेली तीन वर्षे सातत्याने न्याय मागूनही दिलासा मिळत नाही असे त्यांचे म्हणणे होते. शेवटी विधानसभाध्यक्ष नाना पटोले व उदय सामंत यांनी आमदार निवास येथे जाऊन या शिक्षकाची समजूत काढली. तुमच्या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नेमके काय घडले?

गेले अनेक वर्षे खैरे यांना वेतन मिळाले नसून आता कोरोनाच्या काळातही काम मिळाले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ते आमदार निवासात आले होते. ते संध्याकाळी चौथ्या मजल्यावरच्या खिडकीबाहेर आले आणि आत्महत्येची धमकी दिली.

गजानन खैरे हे संभाजीनगरचे असून नवयुग शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक आहेत. भाजप आमदार संतोष दानवे यांच्या रूम नंबर 401 मध्ये खैरे राहत असल्याचे समजते.

छाया  –  सचिन वैद्य