मुख्यमंत्र्यांची बहीण गाडीत बसलेली असतानाच पोलिसांनी गाडी क्रेनद्वारे नेली ओढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणामध्ये सरकारच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेत्या शर्मिला रेड्डी यांना पोलिसांनी त्यांच्या वाहनासह आंदोलनस्थळावरून दूर नेले. त्यावेळी शर्मिला रेड्डी स्वतः कारमध्ये बसून होत्या. पोलिसांना त्यांना ताब्यात घ्यायचे होते, पण ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या शर्मिला यांनी खाली उतरण्यास नकार दिला. मात्र तेलंगणा पोलिसांनी त्यांना गाडीतून खाली न उतरवता कारसह ताब्यात घेतले. पोलिसांचा वाहन उचलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शर्मिला रेड्डी या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिण आहेत. त्या तेलंगणातील YSR तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा आहेत. शर्मिला रेड्डी मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री केसीआर यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थकही उपस्थित होते. सोमवारी वारंगल येथे त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता. टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला हा केल्याचा आरोप करण्यात आला होता.

यानंतर पोलिसांनी शर्मिला आणि त्यांच्या 6 समर्थकांना अटक करून नंतर स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले आणि न्यायालयीन कोठडीची मागणी केली. यादरम्यान त्यांना आई विजयम्मा यांना भेटायचे होते, परंतु पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले. शर्मिला या केसीआरच्या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी घराबाहेर पडल्यावर दुपारी बाराच्या सुमारास संपूर्ण नाट्य सुरू झाले. गाडी राजभवन रोडवर पोहोचल्यावर त्या गाडीच्या मागच्या सीटवरून पुढे आल्या आणि त्या स्वतः गाडी चालवू लागल्या.

यादरम्यान पोलीस त्यांना थांबवण्यासाठी पोहोचले आणि त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितले. मात्र शर्मिला यांनी नकार दिल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी क्रेनद्वारे ओढली. मात्र यावेळी शर्मिला या ड्रायव्हिंग सीटवरच बसल्या होत्या. यादरम्यान त्या टीव्ही चॅनेल्सना फोनवर मुलाखत देत ​​होत्या. त्या म्हणाल्या की, आम्ही सरकारच्या अपयशावर प्रकाश टाकत होतो आणि त्यादरम्यान केसीआरच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला. आमच्या वाहनाची तोडफोड कशी झाली हे आम्ही मुख्यमंत्र्यांना दाखवणार होतो.