शीव येथील आणिक डेपोत दहा बस जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीव येथील आणिक आगारात भीषण अग्नितांडव आज सायंकाळी घडले. यात 10 सीएनजी कंत्राटी बसेस जळून खाक झाल्या. सुदैवाने, आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग सुरू असताना मोठमोठे स्पह्ट झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली.

आणिक आगाराच्या पार्किंग क्षेत्रात सायंकाळी पाचच्या सुमारास वेटलिजच्या (कंत्राटी बस) एका बसमध्ये स्फोट झाला आणि काही क्षणांत आगीचा भडका उडाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक करीत 10 बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि दीड तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

शिवसैनिक, मनसैनिक मदतीसाठी धावले

आगीचे वृत्त कळताच मदतीसाठी शिवसैनिक आणि मनसैनिकांनी धाव घेतली. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेवरून चेंबूर विधानसभा संघटक महेंद्र नाकते यांनी रुग्णवाहिका तैनात ठेवली. बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी शीव विधानसभा संघटक गजानन पाटील, बेस्ट कामगार सेना उपाध्यक्ष गणेश शिंदे, विष्णू शिवकर, राजू आंबेरकर, लवू नर उपस्थित होते.