महाराष्ट्रात येणारा टेस्ला प्रकल्पही गुजरातला पळवला! पुढील महिन्यात ‘व्हायब्रंट गुजरात’मध्ये घोषणेची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेदांता फॉक्सकॉनसह अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला पळवण्यात आले. आता इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील जगातील बलाढय़ कार उत्पादन कंपनी टेस्लाचा प्रकल्प गुजरातला नेल्याचे वृत्त आहे. पुढील महिन्यात गांधीनगर येथे होणाऱया ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात येऊ घातलेले सगळेच मोठे प्रकल्प, गुंतवणूक फक्त गुजरातलाच का नेले जातात? महाराष्ट्रातील रोजगारनिर्मिती का हिरावली जाते, असा सवाल जनता विचारत असून मोदी सरकारच्या दुजाभाव कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

गुजरातचे आरोग्य मंत्री आणि राज्य सरकारचे प्रवक्ते हृषीकेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टेस्लाच्या अधिकाऱयांकडून कार उत्पादन प्रकल्पासाठी विविध राज्यांची पाहणी सुरू होती. टेस्लाच्या अधिकाऱयांनी गुजरातलाही भेट दिली आणि देशातील पहिला प्रकल्प येथे उभारण्यास प्राधान्य दिले आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल, असे पटेल यांनी सांगितले. दरम्यान, सानंद येथे हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

जुलैमध्ये पंतप्रधान मोदी आणि मस्क यांची भेट

विदेशातून येणाऱया वाहनांवर हिंदुस्थानात मोठे आयात शुल्क आकारले जाते. आयात शुल्कात कपात करावी अशी मागणी टेस्लाने केंद्र सरकारकडे केली होती. ही मागणी मान्य न झाल्याने 2022मध्ये हिंदुस्थानात प्रकल्प उभारण्याचा निर्णय टेस्लाने गुंडाळून ठेवला होता. मात्र जुलै 2023मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला. त्या वेळी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि मोदी यांची भेट झाली. या भेटी दरम्यान हिंदुस्थानात टेस्लाचे उत्पादन करण्याचे संकेत दिले होते. मात्र प्रकल्पाचे ठिकाण सांगण्यात आले नव्हते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी अमेरिकेतील टेस्ला कंपनीला भेट दिल्याचे वृत्त आहे.

टेस्लाने पहिले ऑफिस पुण्यात सुरू केले

पुण्यातील चाकण आणि परिसर हा देशातील मोठा ऑटोमोबाईल हब आहे. मर्शिडीजसह अनेक विदेशी कंपन्यांचे कारचे उत्पादन येथे होते. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनीही ऑगस्ट 2023मध्ये हिंदुस्थानातील टेस्लाचे पहिले ऑफिस पुण्यातील पंचशील बिजनेस पार्क येथे सुरू केले आहे. ही तयारी सुरू असताना उत्पादन प्रकल्प गुजरातला कसा पळविला, हा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

ब्लुमबर्गच्या अहवालानुसार टेस्लाकडून महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन ठिकाणांचा विचार सुरू होता. इलेक्ट्रिक कारसाठीची इकोसिस्टीम आणि निर्यातीच्या दृष्टीने याचा विचार सुरू होता.

केंद्र सरकार केवळ गुजरातसाठीच काम करते – रोहित पवार
टेस्ला कंपनीसाठी तंबू गुजरातमध्येच रोवण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आल्याचे वृत्त हे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. यातून महाराष्ट्र सरकारच्या अक्षम्य नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब होतेच, पण प्रत्येक नवीन उद्योग आणि महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात होणारी गुंतवणूक फक्त गुजरातमध्येच केली जात आहे. केंद्र सरकार हे केवळ गुजरातसाठीच काम करत असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’द्वारे केली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना सध्याच्या दोन्ही सरकारकडून कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. भविष्यात महाराष्ट्राचा विकास आणि गुंतवणूक आणून नवीन रोजगारनिर्मिती करायची असेल तर या दोन्ही सरकारांना सत्तेवरून खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही, असे पवार यांनी सांगितले.