पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार, सुरत ते बिलीमोरा अंतर कापणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अतुल कांबळे

देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये सुरत ते बिलीमोरापर्यंत धावेल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी येथे केली. त्यानंतर ही बुलेट ट्रेन दोन वर्षांत वापी स्थानक गाठेल, असेही ते म्हणाले.

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची सोमवारी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम गुजरात राज्यात वेगाने सुरू असले तरी महाराष्ट्रात जमीन संपादन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढेल असेही ते म्हणाले.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम गुजरात राज्यात वेगाने सुरू असले तरी मुंबई आणि महाराष्ट्रातील 70 टक्के खासगी जमीन संपादन पूर्ण झाले आहे. उरलेली जमीन एकतर वन खात्याच्या किंवा सरकारच्या मालकीची असल्याने तिचे संपादनही लवकरच पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारशी बोलणी सुरू करण्यात आली आहेत, असेही अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत जमिनीचे संपादन 90 टक्के पूर्ण होत नाही तोपर्यंत टेंडरचे वाटप करता येत नसल्याने या प्रकल्पाला आणखी उशीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वहिवाट कायम राहणार

मुंबई ते अहमदाबाद प्रकल्प काही कि.मी.चा पट्टा वगळता संपूर्ण एलिव्हेटेड (उन्नत स्वरूपाचा) करण्यामागे शेतकरी तसेच ग्रामस्थांची वहिवाट बाधित होऊ नये, दोन भागांत गावांची फाळणी होऊ नये, ग्रामस्थांना त्यांचे नित्य व्यवहार नीट करता यावेत याची काळजी घेण्यासाठी हा प्रकल्प बहुतांशी उन्नत स्वरूपातच बांधला जात आहे, असे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्निहोत्री यांनी सांगितले.

मुंबई ते पुणे वंदे भारत धावणार का?

अत्याधुनिक सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’चे दोन प्रोटोटाईप रेक ऑगस्टमध्ये आयसीएफ कारखान्यातून बाहेर पडतील. त्यानंतर ऑक्टोबरपासून दर महिन्याला चार ‘वंदे भारत’ रेक कारखान्यातून बाहेर पडतील. देशातील चारशे शहरे या ‘वंदे भारत’ ट्रेनने जोडली जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मुंबई ते पुणे ‘वंदे भारत’ गाडी चालविणार का? या प्रश्नावर मुंबई आमच्यासाठी खास आहे; परंतु ट्रेन कुठे चालविणार हे मी आता सांगून बाकीच्या शहरवासीयांना नाराज करू शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले.