
मुंबई उच्च न्यायालयात पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर 1985 साली रुजू झालेल्या पहिल्या महिला चोपदार अनिता मोरे या मंगळवारी सेवा निवृत्त झाल्या. मोरे यांनी हायकोर्टाची 36 वर्ष सेवा केली. रत्नागिरीतील शिवथर गावात राहणाऱ्या आत्माराम मोरे यांच्याशी अनिता यांचा विवाह झाला. हायकोर्टात सेवा बजावताना आत्माराम यांचे 1982 साली अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर 1985 मध्ये अनिता रुजू झाल्या. साक्षर नसल्यामुळे सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रारंभी न्यायमूर्ती श्रीमती के. के .बाम त्या नंतर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती हेमंत गोखले, न्यायमूर्ती रोशन दळवी, नितीशा म्हात्रे आणि सध्या विद्यमान न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या जवळ त्यांनी काम केले.

























































