लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 400 काय 300 ही पार करू शकला नाही. भाजपचे तर अडीचशेही निवडून आलेले नाहीत. मुंबई, महाराष्ट्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखले. भाजपला बहुमत मिळालेले नाही. हा मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा पराभव आहे, आता भाजपचे नाही इंडिया आघाडीचे सरकार येणार, असा विश्वास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. या पराभवामुळे मोदी-शहांचे नाक कापले गेले असून आता कापलेले नाक घेऊन देशात फिरा, असा टोलाही त्यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपाने बजरंगबली आणि प्रभू श्रीरामाच्या नावाने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे जनतेला मूर्ख बनवले. श्रीराम, बजरंगबली भाजपसोबत नाही तर इंडिया आघाडीसोबत आहेत. म्हणूनच अयोध्येत भाजपचा पराभव झाला, असे संजय राऊत म्हणाले.
मोदी-शहांचा अहंकार जनतेने संपवला
मोदी-शहांचा अहंकार या देशाने संपवला आहे. आता मोदी-शहांची भागमभाग सुरू आहे. भाजपसोबत या सरकार बनवू, म्हणत आता अनेकांसमोर हात जोडत आहेत. पण मोदींचे सरकार स्थापन होत नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. मोदींचा पराभव झाला आहे, त्यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. आता पह्डापह्डी करून सरकार बनवण्याचा प्रयत्न कराल तर जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. मोदींचा सपशेल पराभव झाला आहे. आता झोळी घेऊन निघा, हाच जनादेश आहे आणि जनतेचा संदेश आहे, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना, राष्ट्रवादी फोडलीत त्याचा जनतेने सूड घेतला
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालने सर्वात मोठा खेला केला आहे. जिथे जिथे मोदी-शहांनी अन्याय-अत्याचार केला आहे ती सर्व राज्ये त्यांच्याविरोधात गेली आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने पह्डला. त्याचा बदला आज महाराष्ट्रातील जनतेने घेतला, असे सांगतानाच, जेव्हा-जेव्हा अशी फोडाफोडी केली जाईल, महाराष्ट्र तुमच्याविरोधात उभा राहील, असा इशाराही खासदार राऊत यांनी दिला.