परळीतील मराठा मोर्चाच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस, रोज एका गावातून मिळतोय पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, परळी वैजनाथ

परळीत रविवार पासून मराठा क्रांती मोर्चाने रोखठोक आंदोलन सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे, देवराव लुगडे यांच्यासह समाजबांधव परळी तहसील समोरील प्रांगणात आमरण उपोषणास बसले आहेत. हे उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.आंदोलनाला पाठिंब्यासाठी परळी तालुक्यातील रोज एका गावातुन समाजबांधव साखळी उपोषण करत आहेत.

सरकारने दिलेल्या कालमर्यादेत एकही मागणी पूर्ण न झाल्याने परळीत तहसील कार्यालया समोर रविवार 25 नोव्हेंबर पासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी विविध गावातील मराठा समाजबांधव साखळी उपोषण करत आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज मंगळवार दि. 27रोजी बोधेगाव येथील समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी होऊन सरकार बद्दल तीव्र निषेध व्यक्त केला.

अंबाजोगाई तालुक्यातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. माधव जाधव, नांदगावचे सरपंच अजित गरड, संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्यध्यक्ष प्रविण ठोंबरे, धर्मराज सोळंके, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राणा चव्हाण, पंचायत समिती सदस्य प्रा.प्रशांत जगताप व इतर यांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला.