येरवडा कारागृहातून रजेवर असलेले तीन कैदी पसार, भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तीन आरोपींना पॅरोलवर सोडल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर न झाल्याने त्यांच्याविरुद्ध येथील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास गणेश नायडू (रा. कोंबडीवालामळा, सोलापूर रस्ता, नगर), सूरज विठ्ठल वाल्मीकी (रा. इंदिरानगर, भिंगार), साहेबराव मोहन बेरड (रा. दरेवाडी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.  येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे दत्तात्रय लक्ष्मण किरवे (वय 39, रा. पोलीस क्वॉर्टर्स, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

एका गुह्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले आरोपी नायडू, वाल्मीकी व बेरड यांना 12 मे 2022 रोजी कोविड-19 आपत्कालीन आकस्मिक रजेवर सोडले होते. आरोपींना वेळोवेळी 23 वेळा रजा वाढवून दिली होती. दरम्यान, त्यांची रजा 1 जून रोजी संपत असल्याने ते हजर होणे आवश्यक होते; परंतु ते हजर न झाल्याने शेवटी दत्तात्रय किरवे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस नाईक आर. टी. गोरे तपास करीत आहेत.