
वडाळ्यामधील अँटॉप हिल येथे आज सकाळी तीन एकमजली घरे कोसळली. या दुर्घटनेत 9 जण ढिगाऱ्याखाली अडकून पडले, मात्र अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य हाती घेत त्यांची सुटका केली. जखमीपैकी 7 जणांवर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वडाळ्यामधील अँटॉप हिल परिसरात मंगळवारी सकाळी 8च्या सुमाराला जय महाराष्ट्र नगर येथील चर्च गल्लीत असलेली तीन एकमजली घरे कोसळली. यात तीन घरांच्या तळमजल्यावर रेशन दुकान, भंगार आणि मिठाचे दुकान होते. रेशन असलेल्या घरात दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे. घराखाली 9 जण अडकून पडले होते, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. चार अग्निशमन दलाच्या गाड्या, एक बचावकार्य करणारी गाडी, जेसीबी, डंपर आणि 20 कामगारांच्या साहाय्याने जवानांनी अडकून पडलेल्या 9 जणांची सुखरूप सुटका केली.




























































