टायर फुटल्याने दोन कारची समोरासमोर धडक, दोन ठार; चारजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या कारचा टायर फुटल्यानंतर कार दुभाजकाला धडकून दुसऱया कारवर आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडवळ शिवारात शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. दरम्यान, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठ दिवसांपासून सतत अपघात घडत असून, आठ दिवसांत सहाजणांचा मृत्यू झाला आहे.

शशिकांत सदाशिव अधटराव (वय 42, रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव), निखिल शशिकांत बिराजदार (वय 40, रा. अक्कलकोट) अशी मृतांची नावे आहेत. तर, ओवी निखिल बिराजदार (वय 8, रा. अक्कलकोट), अनुराधा रविकांत बिराजदार (वय 38, रा. धाराशिव), सुनीता शशिकांत अधटराव (वय 40),  बालाजी काशिनाथ साठे
(वय 52, दोघे रा. माकणी, ता. लोहारा, जि. धाराशिव) अशी गंभीर जखमींची  नावे आहेत. सर्व जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोहोळ तालुक्यातील वडवळ शिवारात पुण्याहून सोलापूरकडे येणाऱया कारचा पुढचा टायर अचानक फुटला. यामुळे चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकाला धडकली. यानंतर विरुद्ध दिशेला जाऊन सोलापूरहून टेंभुर्णीला जाणाऱया दुसऱया कारला या कारने धडक दिली. यात दोन्ही कारमधील दोघांचा मृत्यू झाला असून, चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मोहोळ पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक जोतिबा पवार व सर्जेराव जाधव तपास करत आहेत.