
पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. विरोधी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या हल्ले सुरू आहेत. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर आज खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच त्यांच्यावर दगडफेक झाली. त्यात त्यांचे डोके फुटले. भाजप समर्थकांनीच हा हल्ला केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.
निवडणूक निकालानंतर झालेल्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्या अटकेचा निषेध म्हणून निवेदन देण्यासाठी कल्याण बॅनर्जी रविवारी हुगळी येथील चंडीतला पोलीस ठाण्यात चालले होते. ते येण्याआधीच तिथे मोठा जमाव जमला होता. बॅनर्जी येताच काही लोकांनी काळे झेंडे दाखवून ‘चोर, चोर’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. बॅनर्जी हे त्यांना सामोरे जाण्यासाठी जात होते, मात्र पोलिसांनी जमावाला पांगवण्याऐवजी बॅनर्जी यांना अडवले. हा गोंधळ सुरू असतानाच मागील बाजूने बॅनर्जी यांच्या डोक्याला काहीतरी लागले. ते अचानक डोके धरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
- अभिषेक यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ममतांनी भाजपवर पुन्हा टीका केली. ‘अभिषेक यांना मारण्याचाच कट होता. हेल्मेट घातल्यामुळे ते वाचले. जखमी झाल्यानंतर त्यांना उपचार मिळू नयेत म्हणून भाजपकडून रुग्णालयावर दबाव टाकण्यात आला, असा आरोपही ममतांनी केला.’
सीआरपीएफ जवानांनी वाचवले, नाहीतर
भाजपच्या गुंडांनीच माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप कल्याण बॅनर्जी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. ‘चंडीतला पोलीस ठाण्याकडे जात असताना भगवे कपडे घातलेले 10 ते 15 लोक मला आडवे आले. त्यांनी मला शिवीगाळ केली. तरीही मी थांबलो नाही. त्यावेळी माझ्यावर दगडफेक झाली. मी रस्त्यावर पडलो. मला मारण्याचाच त्यांचा कट होता, पण सीआरपीएफच्या जवानांनी मला वाचवले. बंगाल पोलीस मूकदर्शक बनून उभे होते. त्यांनी काहीही केले नाही,’ असा आरोप कल्याण बॅनर्जी यांनी केला.
हा लोकशाहीचा खून – ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी कल्याण बॅनर्जी यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. ‘कालच भाजपच्या गुंडांनी अभिषेक यांच्यावर निर्घृण हल्ला केला. त्याचे व्हिडीओ लोकांसमोर असतानाही आज भाजपने कट आखून कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला केला. भाजप लोकशाहीचा खून पाडते आहे,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.






















































