
महागाईचा भस्मासूर वाढतच चालला असून पेट्रोल-डिझेल, सीएनजीनंतर आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. तेल आणि विपणन कंपन्यांनी घरगुती वापराच्या 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण पडला असून यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका केली असून टप्प्याटप्प्याने धक्का द्यायचा हे पंतप्रधानांचे सूत्र असल्याचे ते म्हणाले.
गॅस सिलिंडर पोहोचला 941.50 रुपयांवर
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाली असून या दरवाढीमुळे मुंबईतील किंमत 912 रुपयांवरून आता 941.50 रुपयांवर पोहोचली, तर दिल्लीमध्ये 942, कोलकातामध्ये 968, चेन्नईमध्ये 957.50 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 7 मार्चला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती. यासोबतच लहान 5 किलोग्रॅमच्या सिलिंडरचा दर 339 रुपये झाला आहे, तर 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 3,113.50 पैशांवर स्थिर ठेवण्यात आली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
दरम्यान, गॅस सिलिंडरच्या दरवाढीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, सातत्याने ही दरवाढ होत आहे. ही दरवाढ होत होत कुठवल आली आहे हे आपण बघितले आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा सामान्य माणसाच्या प्रपंचावर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला सांगितले की, आम्ही महागाई नियंत्रणात ठेवतोय. पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने धक्का घ्यायचा हे त्यांचे सूत्र आहे. त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्यवेळी कळेल.
टप्प्याटप्प्याने धक्का द्यायचा हे पंतप्रधानांचे धोरण, इंधन दरवाढीवरून शरद पवारा यांनी सुनावले pic.twitter.com/BBVwAwqVB1
— Saamana Online (@SaamanaOnline) June 7, 2026

























































